यांगून : आपत्कालीन परिस्थितीपायी मध्य म्यानमारमध्ये एअर बागान कंपनीचे विमान मंगळवारी रस्त्यावर अचानक उतरले आणि त्याची धडक बसून दोघांनी जीव गमावला तर ११ जण जखमी झाले. जखमींमध्ये चार परदेशी पर्यटक आहेत. यांगूनहून ६५ प्रवासी आणि सहा कर्मचाऱ्यांसह निघालेले हे विमान शान राज्यातील हेहो विमानतळाकडे चालले होते. विमानतळापासून तीन किलोमीटर अंतरावर विमान अचानक रस्त्यावर उतरवावे लागले. विमानाच्या धडकेत एक दुचाकीस्वार आणि ११ वर्षांचा एक मुलगा ठार झाले. हे दोघे म्यानमारचे नागरिक होते. नाताळानिमित्त अनेक पर्यटक या विमानाने प्रवास करीत होते. हे विमान तातडीने का उतरवावे लागले, याचे कारण मात्र विमान कंपनीने उघड केलेले नाही.
एअर बागान ही म्यानमारमधील पाच खाजगी विमान कंपनींपैकी एक आहे. ताय झा या बडय़ा उद्योजकाच्या मालकीच्या हेटू ट्रेडिंग कंपनीशी ती संलग्न आहे.