अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणात आता स्वामी असिमानंद यांच्यापाठोपाठ इंद्रेश कुमार व साध्वी प्रज्ञा या दोघांचीही निर्दोष सुटका होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी विशेष न्यायालयात अंतिम पुरवणी अहवाल सादर केला. यामध्ये एनआयएने अजमेर स्फोटात इंद्रेश कुमार व साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, यावेळी विशेष न्यायालयाने अहवालात फरार आरोपींच्या संपत्तीचा तपशील का नमूद केला नाही, याबद्दल एएनआयला विचारणा केली. याप्रकरणाची पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी होणार आहे.

अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी स्वामी असीमानंद यांच्याबरोबर पाचजणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) जयपूर न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. मात्र, या प्रकरणातील इतर तिघांना मात्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. असीमानंद यांच्याविरोधात पुरावे मिळाले नसल्याचे एनआयएने म्हटले होते. सुनील जोशी (मृत), भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. २००१ मध्ये एनआयएनेच असीमानंद हेच या स्फोटाचे मास्टरमाइंड असल्याचे म्हटले होते. दरम्यान, स्वामी असीमानंद यांच्या निर्दोष मुक्ततेवर पाकिस्तानने चिंता व्यक्त केली होती. भारताने असीमानंद सारख्या लोकांची सुटका करुन नवीन पायंडा पाडू नये असे त्यांनी म्हटले आहे. स्वामी असीमानंद यांची सुटकेमुळे दहशतवाद्यांना वेगळा संदेश जाईल असे पाकिस्तानने म्हटले होते.

अजमेर येथील सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गामध्ये ऑक्टोबर २००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जण ठार तर ३० जण जखमी झाले होते. सुरूवातीला राजस्थान एटीएसने तपास सुरू केला होता. २० ऑक्टोबर २०१० रोजी अजमेर न्यायालयात तीन आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.