बिहार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ‘एमआयएम’ पक्षाच्या ओवेसी बंधूंना धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रक्षोभक टीका केल्याप्रकरणी ‘एमआयएम’ पक्षाचे आमदार आणि असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांच्या अटकेचे आदेश बिहार पोलिसांनी जारी केले आहेत. त्यामुळे बिहार निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे.

बिहारच्या किशनगंज भागात रविवारी एका प्रचारसभेत अकबरुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर टीका करताना ‘सैतान’ आणि ‘जालिम’ अशा शब्दांचा वापर केला होता. ओवेसींच्या या प्रक्षोभर भाषणाची दखल घेत किशनगंज पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बुधवारी अकबरुद्दीन यांच्या अटकेचे आदेश निघाल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

आमच्या वकिलांना अद्याप पोलिसांकडून एफआयआरची प्रत मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर वकिल जसे सांगतील तशी पावले उचलली जातील. भाषणात कोणत्याप्रकारची भाषा वापरावी किंवा वापरू नये यावर मला काहीच बोलायचे नाही. गुजरात दंगलीत ३००० निष्पापांचे प्राण गेले आणि मुख्यमंत्री तेव्हा काहीच करू शकले नाहीत. हे कोणीही विसरू शकणार नाही, असे अकबरुद्दीन ओवेसी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेनंतर एमआयएमने आपला राजकीय विस्तार करण्याच्या उद्देशाने बिहार विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. निवडणुकीच्या रणधुमाळीत बिहारमध्ये जोरदार प्रचारसभा रंगत असून ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासह पक्षाचे इतर नेते जागोजागी प्रचारसभा घेत असून आक्रमक भाषणांनी मतदारांना साध घालत आहेत. पण अकबरुद्दीने ओवेसींच्या अटकेच्या आदेशामुळे एमआयएमचा आक्रमक प्रचार आता पक्षाच्या अंगाशी येऊ लागल्याचे दिसत आहे.