बहुजन समाज पार्टीच्या सर्वोसर्वा मायावती यांना जोरदार झटका बसला आहे. कारण, राजस्थानमधील त्यांच्या सर्व ६ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांना सोमवारी रात्री उशीरा याबाबत पत्र दिले आहे. बसपाच्या या सर्व आमदारांचा काँग्रेसला बाहेरुन पाठींबा होता.

विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यापूर्वी बसपाच्या या सहाही आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली होती. दरम्यान, या आमदारांना काँग्रेसमध्ये विलिनीकरणाला परवानगी देण्यात आली आहे का? या प्रश्नावर बोलताना जोशी म्हणाले, मला त्यांचे विलिनिकरणाबाबतचे पत्र मिळाले आहे. मंगळवारी यावरील प्रक्रिया पार पाडली जाईल. दरम्यान, सध्याच्या परिस्थिती २००९ मधील परिस्थितीप्रमाणे झाली आहे. २००८ मध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यानंतर त्यावेळी देखील बसपाचे ६ आमदार काँग्रेसच्या गेहलोत सरकारमध्ये सामिल झाले होते.

बसपाच्या आमदारांनी यापूर्वी काँग्रेस सरकारमध्ये सामिल न होता बाहेरुन पाठींबा दिला होता. त्यामुळे सरकार अस्थिर स्थितीत होते. मात्र, आता हे आमदार काँग्रेसमध्ये सामिल झाल्याने सरकार स्थिर झाले आहे. त्यामुळे राजस्थानातील २०० जागांच्या विधानसभेत काँग्रेसची संख्या १०६ झाली आहे. सध्या या विधानसभेच्या दोन जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर काँग्रेसला सध्या राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा आणि १३ अपक्ष आमदारांपैकी १२ आमदारांचाही पाठींबा आहे.

राजस्थानमधील ही परिस्थिती पाहता काँग्रेससाठी हा मोठा विजय मानला जात आहे. कारण, आगामी काळात राजस्थानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही येऊ घातल्या आहेत. दरम्यान, काही राजकीय पंडितांनी मध्यंतरी असे भाकितही केले होते की, भाजपा राजस्थानात कर्नाटकसारखी परिस्थिती निर्माण करु शकते. मात्र, आता फासे पलटले आहेत.

दरम्यान, काँग्रेसमध्ये सामिल झालेले बसपाचे आमदार जोगिंदर सिंह अवना यांनी म्हटले की, “आमच्या पक्षाचे आमदार हे बऱ्याच काळापासून बसून होते. मात्र, आता आमच्या मतदारसंघाच्या विकासाचा विचार करता आम्ही काँग्रेसमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला. याचा राज्याच्या विकासालाही फायदा होईल.” काँग्रेसमध्ये सामिल झालेले आणखी एक बसपा आमदार संदीप यादव म्हणाले, “मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यापूर्वीही आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. त्यांनी आम्हाला दुसऱ्या पक्षाचे आमदार असल्याप्रमाणे कधीही वागणूक दिली नाही, त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला.”

जोगिंदर सिंह अवना, संदीप यादव, वाजिब अली, दीपचंद खेरीया, लखन मीना आणि राजेंद्र गुढा हे सहा बसपा आमदार काँग्रेसमध्ये सामिल झाले आहेत.