वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिडेन यांच्यावर युक्रेनकरवी राळ उडवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न केले, या एका गुप्तहेर जागल्याने केलेल्या तक्रारीत काहीही तथ्य आढळून येत नाही, असा दावा व्हाइट हाऊसने केला आहे.

ही तक्रार म्हणजे, घटनांबाबत तिसऱ्याच व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टी आणि वृत्तपत्रांची जमवलेली कात्रणे यापेक्षा मोठे असे काहीही नाही, असे प्रेस सेक्रेटरी स्टेफनी ग्रिशॅम यांनी सांगितले. ट्रम्प यांना याप्रकरणी लपवण्यासारखे काहीही नसल्यामुळे त्यांनीच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सिकी यांच्यासोबतच्या दूरध्वनी संभाषणाची प्रतिलिपी (ट्रान्सक्रिप्ट) सादर केली, असे त्या म्हणाल्या. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या ज्या सदस्यांनी ही प्रतिलिपी वाचली आहे, त्यांनी त्याचे वर्णन ‘अतिशय अस्वस्थ करणारे’ असे केले आहे. डेमॉक्रॅट्स आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांमधील काही लोक हे ज्या खोटय़ा गोष्टी रेटत आहेत, त्यांचा प्रतिवाद करणे व्हाइट हाऊस सुरूच ठेवेल, असेही ग्रिशॅम यांनी सांगितले.