प्रसारमाध्यमे, विविध वाहिन्या किंवा विशेषत: हास्यचित्रांमधून वकिलांची नकारात्मक प्रतिमा रंगविली जाते, मात्र हे अन्याय्य असून सामाजिक जबाबदारीचे भान असलेले नागरिक म्हणून वकिलांची उजळ प्रतिमा उभी राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांनी येथे केले. काश्मीरमधील विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, अध्यापक आणि वकिलांशी ते संवाद साधत होते.
 कायदा ही केवळ उपजीविकेची बाब नाही, त्याला एक सामाजिक अंगही आहे. आणि हे अंग तुमच्या कृतींमधून प्रतिबिंबित व्हावयास हवे, असे कबीर यांनी सांगितले. आज हास्यचित्रे-व्यंगचित्रे यांमधूनही वकिलांची अत्यंत नकारात्मक प्रतिमा उभी राहते. वकिलांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाद्वारे ही प्रतिमा सुधारण्यास मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आज बदलत्या काळात कायद्याच्या विद्यार्थ्यांना अनेक संधींची दारे खुली होत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधीलकीही जपायला हवी, असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. तंत्रज्ञानजन्य सुधारणांनुसार कायद्यातही बदल करणे गरजेचे आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा अस्तित्वात आला तेव्हा त्याचे उद्दिष्ट माहिती प्रमाणित करणे एवढेच होते. आता त्याचेही क्षितिज विस्तारू लागले आहे आणि तंत्रज्ञानातील या बदलांमुळेच कायद्याच्या विद्यार्थ्यांनाही नवी दालने खुली होऊ लागली आहेत, याबद्दल सरन्यायाधीशांनी समाधान व्यक्त केले.