अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अबू इस्माईलचा शोध घेण्यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये मोहीम राबवली जात आहे. दक्षिण काश्मीरमध्ये अबू इस्माईल लपून बसला असावा अशी शक्यता असून दहशतवाद्यांवरील कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अनंतनागमध्ये सोमवारी संध्याकाळी अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात जण ठार झाले होते. ‘लष्कर- ए- तोयबा’ने हा हल्ला केल्याचे उघड झाले असून मूळचा पाकिस्तानचा असलेला कमांडर अबू इस्माईलने या हल्ल्याचा कट रचल्याचा संशय आहे. अबू इस्माईल हा पाकिस्तानचा असून गुप्तचर यंत्रणांच्या हाती सांकेतिक भाषेतील संभाषण लागले आहे. यातून अबूचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाया यशस्वी ठरल्या असून ‘लष्कर’चे अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये कमांडर बाशिर लष्करीचाही समावेश आहे. जम्मू- काश्मीरमध्ये सातत्याने अपयश येत असून सैन्याच्या कारवाईचा बदला घेण्यासाठीच ‘लष्कर- ए-तोयबा’ने हा हल्ला घडवल्याचा संशय आहे. इस्माईल हा गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये सक्रीय होता. काही महिन्यांपूर्वीच त्याने आपला मुक्काम दक्षिण काश्मीरमध्ये हलवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इस्माईलचा शोध घेण्यासाठी आता दक्षिण काश्मीरमध्ये सैन्याची शोधमोहीम सुरु आहे. ‘लष्कर ए तोयबा’ने हा हल्ला केल्याचे वृत्त असले तरी ‘लष्कर’ने या हल्ल्यात सहभाग नसल्याचा दावा केला आहे. आमचा या हल्ल्याशी संबंध नसून या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो असे ‘लष्कर’ने म्हटले आहे. ‘लष्कर’चा प्रवक्ता अब्दुल्ला गझनवीने यात्रेकरूंवरील हल्ला हा इस्लाम धर्माविरोधात असल्याचे त्याने सांगितले.  इस्लाममध्ये कोणत्याही धर्माविरोधात हिंसाचाराला परवानगी नाही असे त्याने स्पष्ट केले.