News Flash

अमेरिकेच्या शिष्टमंडळाची मोदीभेट वादाच्या भोवऱ्यात?

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळावा यासाठी शब्द टाकणाऱ्या अमेरिकेच्या शिष्टमंडळातील प्रत्येक सदस्याने भारतात येण्यासाठी ३ ते १६ हजार अमेरिकी डॉलरची बिदागी दिली

| March 31, 2013 04:04 am

अमेरिकेच्या शिष्टमंडळाची मोदीभेट वादाच्या भोवऱ्यात?

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळावा यासाठी शब्द टाकणाऱ्या अमेरिकेच्या शिष्टमंडळातील प्रत्येक सदस्याने भारतात येण्यासाठी ३ ते १६ हजार अमेरिकी डॉलरची बिदागी दिली असल्याचे वृत्त अमेरिकेत प्रसिद्ध झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दौऱ्याच्या अधिकृततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या वृत्ताचा प्रत्यक्ष भारतात आलेल्या अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र ठामपणे इन्कार केला आहे.
शिकागो येथील नॅशनल इंडियन अमेरिकन पब्लिक पॉलिसी इन्स्टिटय़ूट (एन आय ए पी पी आय) या विचारमंचातर्फे सदर भारतभेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीदरम्यान बंगळुरू, तिरुपती, जयपूर, रणथंबोर अभयारण्य आणि अमृतसर येथील सुवर्णमंदिर आदी स्थळांना भेट देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या शिष्टमंडळात अमेरिकी काँग्रेसचे सदस्य आरॉन शहॉक, सिंथिया ल्युमिन्स आणि कॅथी रॉजर्स आदींचा समावेश आहे. मात्र याबाबत अमेरिकेतील एका स्थानिक दैनिकाने ही ‘पेड ट्रीप’ असल्याचे वृत्त दिले. या आरोपाबाबत बोलताना अमेरिकेतील शिष्टमंडळाचे सदस्य म्हणाले की, कोणत्याही परदेश भेटीपूर्वी त्याची पूर्ण छाननी अमेरिकेच्या कायदेमंडळामार्फत होते, त्याला अनुमती मिळाल्यानंतरच दौरा आखला जातो. हे आरोप दुर्दैवी असून आमची गुजरात भेट काही जणांच्या डोळ्यात खुपत असल्याचे दिसते, मात्र योग्य त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून व कोणताही अवैध मार्ग न अवलंबता आम्ही येथे आलो आहोत, असे शिष्टमंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, काँग्रेसचे रशीद अल्वी यांनी मोदी यांनी व्हिसा मिळवण्यासाठी शिष्टमंडळातील प्रत्येक सदस्याला ९ लाख रुपये ‘बिदागी’ दिल्याचा आरोप केला आहे, तर भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे.
अमेरिकेच्या माजी संसद सभापतींशी मोदी यांची चर्चा
गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे माजी संसद सभापती न्यूटन जिंगरिच यांच्याशी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ माध्यमातून चर्चा केली.
मोदी यांच्यासमवेत विकासासंबंधीच्या धोरणांबद्दल चर्चा करतानाच त्यांच्या कामातून शिकून आपण अमेरिकेतही काय करू शकतो यासंबंधी जिंगरिच यांनी विचारविनिमय केला, असे रिपब्लिकन सिनेट सदस्य अ‍ॅरॉन श्कॉक यांनी येथे पत्रकारांना सांगितले. जिंगरिच यांच्यासमवेत झालेल्या चर्चेप्रसंगी श्कॉक यांच्याखेरीज सिंथिया ल्युमिन्स, कॅथी रॉजर्स आणि गुजरात दौऱ्यावर आलेले अन्य सदस्य उपस्थित होते. मोदी यांच्याबरोबर झालेल्या फलदायी चर्चेनंतर त्यांच्या अमेरिका भेटीची आपल्याला प्रतीक्षा असल्याचे जिंगरिच यांनी सांगितले. ‘व्हायब्रण्ट गुजरात २०१५’च्या जागतिक परिषदेसाठी मोदी यांनी जिंगरिच आणि रिपब्लिकन पार्टीच्या अन्य सदस्यांना निमंत्रित केले आहे.
श्कॉक यांनी मोदी सरकारची मुक्तकंठाने स्तुती केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 4:04 am

Web Title: american lawmakers and modi meet came in problematic
टॅग : Bjp,Narendra Modi
Next Stories
1 इम्रान खान विरुद्ध अभिनेत्री मीरा यांच्यात लढत?
2 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगावर शरदचंद्र सिन्हा यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सरकारकडून थंड बस्त्यात
3 हुंडय़ासाठी सुनेला छळणाऱ्या ओडिशाच्या माजी मंत्र्याला सपत्निक अटक
Just Now!
X