भारत तैवान बरोबर व्यापार संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. तैवान बरोबर व्यापार करारावर चर्चा सुरु करण्याच्या दृष्टीने भारताचा विचार सुरु आहे, या बातम्या प्रसिद्ध झाल्यापासून चीन अस्वस्थ झाला आहे. चीनने लगेच या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. तैवान संबंधीच्या विषयावर भारताने समंजस भूमिका घ्यावी, असे चीनने म्हटले आहे.

भारत-तैवान व्यापार कराराच्या या बातम्यांवर कुठल्याही भारतीय यंत्रणेने अधिकृत शिक्कमोर्तब केलेले नाही. तरीही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या विषयावर आपली भूमिका मांडली आहे. “वन चायना तत्त्व आंतरराष्ट्रीय समुदायाने एकमताने मान्य केले आहे. त्यात भारतही आहे. हेच तत्त्व कुठल्याही देशासोबत संबंध विकसित करताना चीनचा पाया आहे” असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी म्हटले आहे.

तैवान एक स्वतंत्र देश आहे. पण चीन तिबेट प्रमाणे तैवानला सुद्धा आपला भाग मानतो. चीनला तैवानचा भूभाग सुद्धा बळकावयचा आहे. भारताप्रमाणेच चीनचा तैवान बरोबरही वाद सुरु आहे. चीनने भारताप्रमाणेच तैवानलाही दुखावले आहे. सध्याच्या परिस्थितीत चीनच्या दादागिरीमुळे तैवान आणि अमेरिका जवळ आले आहेत. त्यांच्यात संरक्षण करारही झाले आहेत. त्यामुळे चीन चिडला असून चीनकडून तैवानला धमक्या दिल्या जात आहेत. आता भारत आणि तैवानमध्येही व्यापारी संबंध विकसित होत असल्याच्या बातम्यांमुळे चीन अस्वस्थ झाला आहे.

अलीकडेच चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी भारताला तैवानचा राष्ट्रीय दिवशी (Taiwan National Day) या प्रदेशाचा उल्लेख स्वतंत्र देश म्हणून करुन नये असा इशारा दिला होता. भारतातील चिनी दूतावासाने सुद्धा भारतीय माध्यमांना तैवानच्या राष्ट्रीय दिनाचे अभिनंदन करु नका, असा सल्ला दिला होता. पण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतात प्रसारमाध्यमे स्वतंत्र असल्याचे चीनला उत्तर दिले होते. वन चायना पॉलिसीनुसार तैवान चीनचा भाग आहे, हे भारताने मान्य करावे असा चीनचा आग्रह आहे.