कोटय़वधींच्या ‘व्यापम’ घोटाळ्याचे परिणाम मध्य प्रदेशला अद्यापही सोसावे लागत आहेत. खासगी दंत आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या व येत्या १२ जुलैला होऊ घातलेल्या ‘डीएमएटी’ परीक्षेशी संबंधित घोटाळ्यात गुंतलेल्या न्यायाधीशांची नावे जाहीर करण्याची धमकी एका ‘जागल्या’ने दिल्यानंतर, ही परीक्षा रद्द केल्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.
१२ जुलै रोजी होऊ घातलेली डेंटल अँड मेडिकल प्रवेश परिक्षा (डीएमएटी) परीक्षा देणार असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ओएमआर उत्तरपत्रिका स्कॅन कराव्यात, असा आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ही परीक्षा आयोजित करणाऱ्या दि असोसिएशन ऑफ प्रायव्हेट डेंटल अँड मेडिकल कॉलेजेस (एपीडीएमसी) या संस्थेला गुरुवारी दिला होता. या पाश्र्वभूमीवर, या सर्वोच्च संस्थेने शुक्रवारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. तांत्रिक कारणांसाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. महाडिक यांनी सांगितले.
‘व्यापम’ घोटाळ्याबाबतचा वाद अद्याप शमलेला नाही यापाठोपाठच डीएमएटी परीक्षाही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एमपीडीएमसीने या संदर्भातील सूचना त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून, परीक्षेची नवी तारीख नंतर स्वतंत्ररीत्या जाहीर केली जाणार असल्याचे नमूद केले आहे.  डीएमएटी-२०१५ ही परीक्षा मध्य प्रदेशातील ९ केंद्रांसह देशातील विविध केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेतील कथित अनियमिततांच्या मुद्दय़ावर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका प्रलंबित असताना ही परीक्षा पुढे ढकलली जाण्यास महत्त्व आले आहे.