जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले.  ‘हीच काँग्रेसच्या राष्ट्रवादाची नवी व्याख्या आहे का’, या मथळ्याखाली लिहिलेल्या ब्लॉगमध्ये अमित शहा यांनी जेएनयू विद्यापीठात सुरू असलेल्या देशविरोधी कारवाया आणि त्याला असणारा काँग्रेसचा पाठिंबा यावर सडकून टीका केली. काँग्रेस पक्ष जेएनयू विद्यापीठात सुरू असलेल्या या कारवायांना पाठिंबा आणि प्रोत्साहन का देत आहे, असा सवालही शहा यांनी विचारला. तसेच ज्या पक्षाच्या नसानसांत हिटलरशाही भिनलेली आहे त्यांच्याकडून भाजपला राष्ट्रवाद शिकण्याची गरज नाही, असेही शहांनी ठणकावून सांगितले.
केंद्र सरकार यशस्वी कामगिरी करत असताना काँग्रेसला साधी एका जबाबदार राजकीय पक्षाची भूमिकाही पार पाडत आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षात औदासिन्य आलेले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना एखादी गोष्टी देशद्रोही आहे किंवा नाही, यातील फरक कळेनासा झाल्याचे टीकास्त्र शहा यांनी सोडले. राहुल गांधी सध्याच्या सरकारची तुलना हिटलरच्या काळातील नाझी राजवटीशी करत आहेत. मात्र, ते एक गोष्ट विसरत आहेत ती म्हणजे, इंदिरा गांधी यांच्या नेत्तृत्वकाळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीमुळे भारत तेव्हाच त्या पातळीपर्यंत पोहोचला होता. राहुल गांधी आता ज्या कम्युनिस्ट आणि डाव्यांचा कैवार घेत आहेत त्यांनाही आणीबाणीच्या काळात सोडण्यात आले नव्हते. सियाचेनमध्ये शहीद झालेल्या नऊ जवानांना राहुल गांधी याच जोमाने श्रद्धांजली वाहतील का?, सोनिया आणि राहुल गांधी यांनी देशातील १२५ कोटी जनतेला या प्रश्नाचे उत्तर द्यावे, अशी मागणीही अमित शहा यांनी ब्लॉगद्वारे केली.

अमित शहा यांच्या ब्लॉगमधील ठळक मुद्दे:

* ‘जेएनयू’मधील विद्यार्थ्यांनी देशद्रोही कृतीला क्रांती संबोधून भारताच्या एकात्मतेविषयी असंवेदनशीलता व्यक्त केली आहे. याशिवाय सरकारच्या कारवाईला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला म्हणणे चुकीचे आहे.

* देशाच्या राजधानीत असणाऱ्या राष्ट्रीय संस्थेला दहशतवादाच्या प्रचाराचे आणि अनागोंदीचे केंद्र बनविण्यात आले. अशाप्रकारच्या घोषणा देऊन देशाची पुन्हा एकदा फाळणी करायची आहे का, हा एकच सवाल मला विद्यार्थ्यांना करायचा आहे. सरकारने याविरोधात काही कारवाई केली नसती तर ते राष्ट्रहिताचे ठरले असते का?

*  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारला देशविरोधी शक्तींना आळा घालण्यात यश आले आहे. मात्र, काँग्रेस पक्ष या सगळ्याला पाठिंबा देण्याऐवजी देशातील फुटीरतावादी चळवळीला पाठिंबा आणि प्रोत्साहन देत आहे.