केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन; ६५ हजार कोटींच्या औद्योगिक प्रकल्पांचे भूमिपूजन 

देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे केले. राज्य १ लाख कोटींची अर्थव्यवस्था साध्य करून देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्यात मोठी भूमिका पार पाडेल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

येथे ६५ हजार कोटींच्या औद्योगिक प्रकल्पांच्या  भूमिपूजन समारंभात त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी  देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे आपला देश पुढील पाच वर्षांत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांत प्रवेश करील, पाच लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठरवण्यात हाच मोठा विचार आहे.

पहिल्या भूमिपूजन समारंभानंतर याहीवेळी मोठय़ा प्रमाणात राज्यात गुंतवणूक येत असून एकूण ६५ हजार कोटींच्या २५० प्रकल्पांचे भूमिपूजन शहा यांच्या हस्ते झाले.

ते म्हणाले,की पंतप्रधानपदाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असे म्हटले जाते, पण आता पाच लाख कोटींच्या अर्थव्यवस्थेचा मार्गही उत्तर प्रदेशातून जात आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी गेल्या आठवडय़ात असे सांगितले होते, की उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलर्सची करण्याचा उद्देश आहे. ते अशक्य नाही, कारण राज्यात मनुष्यशक्ती व इतर साधने आहेत. चौदाव्या वित्त आयोगात राज्याला जास्त वाटा मिळाला आहे,असे सांगून शहा म्हणाले,की राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारही उत्तर प्रदेशच्या विकासास वचनबद्ध आहे. मोदी जागेपणी स्वप्ने बघतात, ते स्वप्ने पूर्ण झाल्याशिवाय झोपत नाहीत. कायदा व सुव्यवस्थेशिवाय विकास होत नाही, पण योगी आदित्यनाथ सरकारने दोन वर्षांत राज्यात कायदा व सुव्यवस्था सुधारली आहे. येथील प्रशासन पूर्वी राजकारणाने ग्रस्त होते, आता प्रशासन जनतेचे सेवक बनले आहे.

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होतील असे कुणाला वाटले नव्हते, कारण त्यांना प्रशासनाचा अनुभव नव्हता. पण आमचे निकष हे समर्पण व निष्ठा हे आहेत,  परिश्रमाची क्षमता आदित्यनाथ यांच्यात आहे, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री केले. तो निर्णय आदित्यनाथ यांनी त्यांच्या कामातून बरोबर ठरवला आहे.