स्वतचाच नियम मोडून प्रमुख नेत्यांसह चार्टर्ड विमानाने अमित शहा पाटण्यात
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षण समीक्षेसाठी समिती नेमण्याची मागणी केल्याने भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून बिहार निवडणुकीसाठी जमिनीची ‘मशागत’ करणारे भाजप अध्यक्ष अमित शहा भागवत यांच्या ‘त्या’ मुलाखतीनंतर नाराज झाले आहेत. भागवत यांच्या विधानानंतर बिहारमध्ये येऊ घातलेले संभाव्य वादळ शमविण्यासाठी शहा तब्बल अर्धा डझन नेत्यांसह चार्ट्र्ड विमानानेमंगळवारी दुपारी पाटण्यास रवाना झालेत. अध्यक्ष झाल्यानंतर पक्ष पदाधिकारी, केंद्रीय मंत्र्यांना खासगी विमानाचा वापर न करण्याचा नियम लावणाऱ्या शहा यांच्यावर या आणीबाणीत हा नियम मोडण्याची वेळ आली.
गेल्या दोन दिवसांपासून भाजप मुख्यालयात नाराजीची छटा आहे. २०१० च्या तुलनेत या निवडणुकीत तब्बल तिप्पट यादव उमेदवारांना प्राधान्य देऊन बिहारमधील राजकीय समीकरणांना छेद देण्याची रणनीती आखणाऱ्या शहा यांनाच पाटण्यास धाव घ्यावी लागली. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने केवळ सात यादव उमेदवारांना मैदानात उतरवले होते. यंदा हा आकडा २० पर्यंत पोहोचला आहे. अद्याप सात जागी उमेदवार घोषित होणार असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचा दावा भाजप नेत्याने केला. चोख निवडणूक व्यवस्थापन करीत असताना सरसंघचालकांच्या ‘त्या’ मुलाखतीमुळे सर्व रणनीती व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे. आरक्षणाची समीक्षा करण्यासाठी समिती नेमावी, असे मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केल्यावर नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांना आयतेच कोलीत मिळाले. लालूप्रसाद यादव यांनी- आईचे दूध प्यायले असल्यास आरक्षण संपवून दाखवा. आम्ही आरक्षण वाढवू, असे सांगून भाजपला थेट आव्हान दिले. विरोधकांच्या या नव्या माऱ्याला तोंड देण्यासाठी शहा पाटण्यात दाखल झाले आहेत.
सरसंघचालकांचे ‘ते’ वक्तव्य प्रसिद्ध झाल्यावर सोमवारी दुपारी अमित शहा यांच्या कार्यालयात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, ज्येष्ठ नेते श्याम जाजू, खा. मीनाक्षी लेखी, खा. एम.जे. अकबर, खा. भूपेंदर यादव, केंद्रीय संघटनमंत्री रामलाल यांना पाचारण करण्यात आले. तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीनंतर रविशंकर प्रसाद व खा. यादव यांनी पत्रकार परिषद घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी अमित शहा यांनी संघाचे सह-सरकार्यवाह कृष्णगोपाल यांच्यासमवेत सरसंघचालकांच्या ‘त्या’ मुलाखतीवर चर्चा केली. उभय नेत्यांच्या चर्चेनंतर संघाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्याचे मान्य करण्यात आले. तशी सूचना अमित शहा यांनी रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी केली होती.
डॉ. भागवत यांच्या आरक्षणावरील विधानामुळे केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या निवासस्थानी उभारण्यात आलेल्या ‘वॉर रूम’मध्येही दिवसभर शुकशुकाट होता. ‘सारा भारत बार-बार; बिहार केवल एक बार’ असे राजकीय विश्लेषण भाजप नेत्याने केले. बिहारमध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपला जातीऐवजी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवायची होती. मात्र खुद्द सरसंघचालक डॉ. भागवत यांनीच भाजपला तोंडघशी पाडले आहे. विशेष म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या डॉ. सुरेंद्र जैन यांनी भागवत यांचे समर्थन करीत आरक्षणाची समीक्षा झालीच पाहिजे, असे म्हटले आहे.

भाजपमध्ये धारिष्टय़ नाही-लालूप्रसाद
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपने हात झटकले असले तरी संघ परिवाराच्या विरोधात जाण्याचे भाजपमध्ये धारिष्टय़ नाही, अशी टीका नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांनी केली आहे.संघ परिवाराच्या विरोधात जाण्याचे भाजपमध्ये धारिष्टय़ नाही, असे लालूप्रसाद यादव म्हणाले. भागवत यांच्या वक्तव्याचा विपरीत परिणाम बिहारच्या निवडणुकीत होऊ नये यासाठी आता भाजपची सारवासारव सुरू झाली आहे, असे लालूप्रसाद यादव म्हणाले. दरम्यान बसपच्या प्रमुख मायावती यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सरसंघचालकांवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.