मोदी सरकार कर्तारपूर साहिब मार्गिका वेळेत पूर्ण करण्यास वचनबद्ध आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात या मार्गिकेच्या तांत्रिक मुद्दय़ांवर पंजाबमधील गुरूदासपूर जिल्ह्य़ात शून्य बिंदूवर नुकतीच बैठक होऊन चर्चा झाली. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर प्रथमच याबाबत बैठक झाली, त्यानंतर शहा यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. भारत पाकिस्तान यांच्यात तणावाचे संबंध असले तरी ही मार्गिका पूर्ण केली जाईल असे पाकिस्तानने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

शीख बांधवांना गुरू ग्रंथसाहिबच्या प्रकाश पुरबच्या शुभेच्छा देऊन त्यांनी सांगितले,की गुरू ग्रंथसाहिबचा प्रकाश नेहमीच सर्वाना वाट दाखवत राहील, तसेच देशसेवेसाठी प्रेरणा देत राहील. कर्तारपूर मार्गिका वेळेत पूर्ण करण्यास सरकार वचनबद्ध आहे असे त्यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले. गुरू ग्रंथसाहिबचा संदेश हा वैश्विक बंधुत्व, शांततेचा असून त्याच मार्गाने वाटचाल करण्याची गरज शहा यांनी प्रतिपादित केली.

कर्तारपूर मार्गिका ही पाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिबला गुरूदासपूर जिल्ह्य़ातील डेरा बाबा नानक या स्मृतिस्थळाशी जोडणारी आहे. भारतीय शीख यात्रेकरूंना केवळ भेटीची परवानगी घेऊन व्हिसाशिवाय कर्तारपूर साहिब येथे जाता येणार आहे. कर्तारपूर साहिबची स्थापना १५२२ मध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांनी केली होती. नरोवाल येथून ही मार्गिका सुरू होणार असून पाकिस्तान व भारत यांच्यात त्याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. गुरू नानक यांची नोव्हेंबरमध्ये ५५० वी जयंती असून त्यानिमित्ताने कर्तारपूर मार्गिका सुरू करण्यात येणार आहे.