केंद्रातील सध्याचे भाजप सरकार आधीच्या काँग्रेस प्रणीत सरकारपेक्षा खंबीर असून सुरक्षेच्या प्रश्नावर कुठल्याही तडजोडी केल्या जाणार नाहीत, त्यामुळे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ४० जवानांचे पुलवामा हल्ल्यातील बलिदान वाया जाणार नाही, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी येथे जाहीर सभेत सांगितले.

ते म्हणाले,की काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्य़ात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात ४० जवानांनी प्राणार्पण केले असून यात दोषी असलेल्या दहशतावाद्यांना आम्ही कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. हा भ्याड हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला असून जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. कारण केंद्रात काँग्रेसचे नव्हे तर भाजपचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कुठल्याही परिस्थितीत सुरक्षेच्या प्रश्नावर  तडजोड करणार नाही.

आसाम गण परिषद व काँग्रेस यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितले, की आसाम करार लागू करण्यासाठी या दोन्ही पक्षांनी १९८५ मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यापासून काही केले नाही. आम्ही आसामचा काश्मीर होऊ देणार नाही. त्यासाठीच आम्ही नागरिकत्व नोंदणीची मोहीम सुरू केली. जे लोक घुसखोर आहेत त्यांना आम्ही हाकलून देणार आहोत, त्यासाठी आमची वचनबद्धता आहे.  वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झालेले नसून हे विधेयक केवळ आसाम व ईशान्येकडील राज्यांसाठी आहे, असा गैरप्रचार केला जात आहे, असे शहा म्हणाले.