पंजाबातील अमृतसरजवळील जोडा रेल्वेफाटकाजवळ ‘रावण दहन’ पाहण्यासाठी जमलेली गर्दी रेल्वे रुळावरही साचली असतानाच या लोहमार्गावरून वेगाने आलेल्या गाडीची धडक बसून ६१ जण मृत्यूमुखी पडले, तर ७१ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये याच कार्यक्रमाच्या वेळी सादर करण्यात आलेल्या रामलीलेमध्ये रावणाची भूमिका साकारलेल्या दलबीर सिंग या कलाकाराची दूर्देवी मृत्यू झाला आहे. दलबीरच्या मागे त्याची आई, पत्नी आणि आठ महिन्याचे बाळ असा परिवार आहे.

आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याने दलबीरच्या आईला धक्काच बसला आहे. दलबीरच्या आईने सरकारकडे आपल्या मुलाच्या कुटुंबासाठी काहीतरी करावे अशी मागणी केली आहे. ‘माझ्या सुनेला नोकरी द्यावी अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. आठ महिन्याच्या बाळाची संपूर्ण जबाबदारी आता तिच्यावर पडली आहे’ असे दलबीरच्या आईने एएनआयशी बोलताना सांगितले.

या संपूर्ण प्रकारानंतर संतप्त जमावाने या घटनेसाठी प्रशासनाला जबाबदार धरले असून मागील २० वर्षांपासून या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम होत असल्याची माहिती दिली. तर दुसरीकडे रेल्वेचे अधिकारी अश्वीनी लोहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाची कोणतीही माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली नव्हती. तसेच अमृतसर आणि मनावला रेल्वे स्थानकांदरम्यान लोक रेल्वे रुळांवर उभे असल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले आहे.

या अपघाच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अरमिंदर सिंग यांनी आपला इस्रायल दौरा पुढे ढकलला असून ते आज अमृतसरमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच ते जखमींची भेट घेणार असून मृत्यांच्या नातेवाईकांनाही भेटणार आहेत.