रूग्णवाहिका आणायला सहा तास विलंब लावल्यामुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागला. भारतीय भाषा शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. डी. मूर्ती असे या प्राध्यापकांचे नाव असून ते कर्करोगाने ग्रस्त होते. रविवारी त्यांच्यावर विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु मंगळवारी त्यांची तब्येत अचानक बिघाडल्याने डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला. परंतु त्यांच्यासाठी रूग्णवाहिकेची सोय केली नाही. डॉ. मूर्ती यांना वेळेवर रूग्णवाहिका मिळाली असती तर त्यांचे प्राण वाचले असते. रूग्णालय प्रशासनाला एक रूग्णवाहिका देता आली नाही. रूग्णालयात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप करत आणीबाणीच्या वेळी अर्ज भरण्याची गरज होती का, असा सवाल विद्यापीठाचे प्रवक्ते एस. पीरजादा यांनी केला. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट झमीरूद्दीन शाह यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
यापूर्वीही विद्यापीठातील एका विद्यार्थ्याचा जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यूवरील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणात पाच डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला होता.
डॉ. मूर्ती हे तामिळनाडूचे असून ते विद्यापीठ परिसरात एकटेच राहत असत. डॉ. मूर्ती यांच्यावर रविवारी कर्करोगाची गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण त्याचा किडनीवर परिणाम होत असल्याने त्यांना दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला होता, अशी माहिती डॉ. मूर्तींवर उपचार करणारे डॉ. मोहम्मद अस्लम यांनी दिली. तसेच रूग्णवाहिका बोलावण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी विलंब लागल्याचेही त्यांनी या वेळी मान्य केले.