जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमकीच्या घटना घडत आहेत. आज (मंगळवार) पहाटे येथील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात चकमक सुरु होती, यामध्ये एकूण ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर एक जवान शहीद झाला आहे.

कुलगामच्या रेडवानी भागात तर पुलवामाच्या त्रालमधील हाफू भागात गस्तीदरम्यान सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी समोरासमोर आले. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार झाला. यामध्ये जीवितहानीबाबतची कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.


सुरक्षा रक्षकांनी सोमवारी गांदरबल जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान एक दहशतवाद तळ उद्ध्वस्त करीत मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि स्फोटके जप्त केली होती. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली होती.

गांदरबल पोलीस आणि लष्कराच्या ५ राष्ट्रीय रायफल्सने एका सूचनेनुसार जिल्ह्याच्या गुटलीबाग भागात बदरगुंड येथे संयुक्त शोध मोहिम राबवली होती. यावेळी जंगल भागात दहशतवाद्यांच्या एका तळाला उद्ध्वस्त करुन एक इन्सास रायफल, चार मॅगेझिन्स, आठ काडतुसं, एके-४७ रायफलचे ३७ राऊंड आणि १ चिनी हातबॉम्ब जप्त करण्यात आला होता. त्याचबरोबर येथून काही खान्यापिण्याच्या वस्तूही सुरक्षा रक्षकांना आढळून आल्या होत्या.