अमेरिकेतील ह्युस्टन येथे नुकताच पार पडलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगा शो ‘हाउडी मोदी’ याचे सध्या सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर कौतूक होत आहे. दरम्यान, महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी नेहमीप्रमाणे ट्विट करुन या कार्यक्रमाचेही कौतूक केले आहे. तसेच भारत आणि अमेरिकेमध्ये बदललेल्या परस्पर संबंधांवरही त्यांनी भाष्य केले आहे.

आनंद महिंद्रा म्हणतात, “जेव्हा मी १९७३ मध्ये एक विद्यार्थी म्हणून अमेरिकेत आलो होतो. तेव्हा अमेरिकन लोकांमध्ये भारताची ओळख गारूड्यांचा देश अशी होती. मात्र, आता मला आनंद वाटतो की, भारताप्रती अमेरिकन लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. तसेच दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कल्पनेपेक्षा जास्त बदल होत आहे.”

आणखी वाचा- #HowdyModi: ट्रम्प यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोदींचा पाकिस्तानवर निशाणा

‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात मोदींसोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कौतुक करताना ट्रम्प यांनी अमेरिकेचे भारतावर प्रेम असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी ह्युस्टनने आपल्याला दिलेल्या अभुतपूर्व प्रेमाबद्दल आभार मानले. यावेळी मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये चांगली एकजूट पहायला मिळाली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील भारतीयांना आवाहन केले की त्यांनी कमीत कमी पाच बिगर भारतीय कुटुंबांना भारत दाखवण्याच्या उद्देशाने घेऊन यावे त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. तसेच अमेरिकेतील भारतीय समुदयाची प्रशंसा करताना भारत-अमेरिका संबंधांच्या सोनेरी भविष्यासाठी त्यांनी एक आधारस्तंभ स्थापित केल्याचे मोदी यावेळी म्हणाले.