अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होते. या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. निकालानंतर महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत या पाच न्यायाधीशांना सलाम केला आहे.

”पाच पुरुष. १३० कोटी लोकांचं लक्ष या निकालाकडे लागून होतं. या खंडपीठावर असण्यासाठी विलक्षण धैर्य आणि निकालापर्यंत पोहोचण्यासाठी अविश्वसनीय मानसिक संतुलनाची गरज लागली असेल. त्यांच्या कामाला व देशाच्या न्यायप्रक्रियेला माझा”, या शब्दांत आनंद महिंद्रांनी भावना व्यक्त केल्या.

आणखी वाचा : Ayodhya verdict : अयोध्या निकालानंतर तापसीने विचारला ‘हा’ प्रश्न

गेल्या अनेक दशकांपासून रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद सुरु होता. सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागी राम मंदिर उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात यावी असे आदेश निकाल वाचनादरम्यान दिले. मंदिर उभारणीसंदर्भात ट्रस्ट निर्माण करून मंदिर निर्मितीबाबत नियम तयार करावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.