रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज (९ नोव्हेंबर) लागणार आहे. या खटल्याची सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सलग ४० दिवस सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं १६ ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्विटवरुन या खटल्यासंदर्भात आपले मत व्यक्त केलं आहे.

ट्विटरसारख्या माध्यमांवर कायम अ‍ॅक्टी्व्ह असणाऱ्या महिंद्रा यांनी या खटल्याचा निकाल भारताला मजबूत करणारा असावा असं मत व्यक्त केलं आहे. “मला या निकालाची अती जास्त काळजी नाही. पण मी एका अशा निर्णयासाठी प्रार्थना करेन जो आम्हाला एक देश म्हणून आणखी मजबूत आणि एकत्र करण्यास मदत करेल,” असे ट्विट केलं आहे.

दरम्यान, पतंप्रधान नरेंद्र मोदींनीही या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. हा निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही, निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी, असं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री तसेच भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वादग्रस्त विधान न करण्याची सूचना केली आहे. संघ परिवार तसेच, मुस्लीम संघटनांनीही लोकांना शांतता राखण्याचे आणि निकालाचा आदर करण्याची विनंती केली आहे. दोन्ही समाजात सलोखा आणि सामंजस्य राहावे यासाठी गेल्या आठवडय़ात बैठकाही झाल्या होत्या.