बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अनेक राज्यात पाऊस कोसळत असून, आंध्र प्रदेश व तेलंगानात तर अक्षरशः तांडव घातलं आहे. गेल्या २४ तासात दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, पावसामुळे हैदराबादमधील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मदतकार्य करण्यासाठी शहरातील रस्त्यावर बोटीतून प्रवास करावा लागत आहेत. हैदराबादमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

बंगालच्या उपसागरात व काकीनाडा किनारपट्टी लगतच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं हवामान विभागानं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणासह काही राज्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला होता. वातावरणात झालेल्या बदलांमुळे गेल्या २४ तासांपासून पाऊस सक्रिय झाला असून, आंध्र प्रदेश व तेलंगणात थैमान घातलं आहे. आंध्र व तेलंगणातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, राजधानी हैदराबादमध्ये जनजीवन कोलमडून पडलं आहे.

हैदराबादमधील भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात २० सेटींमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पाऊस कायम असल्यानं हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गही पूराच्या पाण्याखाली गेला आहे. दम्मईगुडा परिसरात पावसाचं पाणी वाढल्यानं एक कार वाहून गेली. त्याचबरोबर हैदराबादमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात १४ जण मरण पावले आहेत. जुन्या हैदराबाद शहरात मंगळवारी मध्यरात्री १० घरांना लागून असलेली संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली. या भीषण घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ बालकांचा समावेश आहे. शमशाबादमधील गगनपहाड परिसरातही पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत हैदराबादमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून, राज्यात १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नजर ठेवून असून, युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. एसडीआरएफच्या तुकड्या पावसामुळे प्रभावित झालेल्या भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. पावसामुळे उस्मानिया विद्यापीठ व जवाहलाल नेहरू टेक्निकल विद्यापीठाच्या आज व उद्या होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशातही मंगळवारी झालेल्या पावसामुळे ४० गावांमधील ३५० घरांचं नुकसान झालं आहे.