अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैवकांच्या अतिवापराने मुलांच्या विकासावर परिणाम होतो असे संशोधनात दिसून आले आहे. अनेकदा साध्या सर्दीवरही प्रतिजैविकांची मात्रा दिली जाते व त्यामुळे हळूहळू जीवाणूही प्रतिजैवकांना दाद देत नाहीत. शिवाय त्यांच्या सततच्या वापरामुळे वजन वाढणे किंवा हाडांची अतिरिक्त वाढ होणे असे परिणाम दिसू शकतात.
उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. मुलांसाठी वापरली प्रतिजैविके उंदरांमधील माद्यांना दिली असता त्यांचे वजन वाढलेले दिसले व हाडांची अतिरिक्त वाढ दिसून आली. प्रतिजैविकांमुळे आतडय़ातील मायक्रोबायोम म्हणजे कोटय़वधी जीवाणूंच्या वस्तीस्थानावर वाईट परिणाम होतो असे दिसून आले. एकूणच ज्या उंदरांना अ‍ॅमॉक्सिलीन , टायलोसिन या प्रतिजैवकांची मात्रा देण्यात आली त्यांच्यात अनिष्ट परिणाम झाले. ही प्रतिजैवके मॅक्रोलाईड गटातील असून मुलांना दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांच्या गटाचे प्रतिनिधीत्व करतात. मुलांना ज्या प्रमाणात प्रतिजैवके दिली जातात त्याच प्रमाणात उंदरांना ही प्रतिजैवके देण्यात आली व उंदरांच्या एका गटाला ती देण्यात आली नाहीत. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या ह्य़ूमन मायक्रोबायोम कार्यक्रमाचे संचालक मार्टिन ब्लेझर यांनी सांगितले की, मुलांवर लहान असताना प्रतिजैवकांचे जे परिणाम होतात ते यातही दिसून आले. प्रतिजैवकांचा वापर आपण बेदरकारपणे करीत असतो असे ब्लेझर यांचे मत आहे. लहानपणी प्रतिजैवकांचा जास्त वापर केल्यास आतडय़ातील जीवाणू नष्ट होतात व शरीरातील चयापचयाची क्रिया कायमची बिघडते व त्यामुळे लठ्ठपणा कालांतराने वाढीस लागतो. टायलोसिनमुळे वजन वाढते, तर अ‍ॅमॉक्सिलिनमुळे हाडांची वाढ जास्त होते. डीएनए क्रमवारीच्या माहितीनुसार प्रतिजैवकांमुळे आतडय़ातील मायक्रोबायोमला धक्का बसतो. जीवाणूंची विविधता नष्ट होते व त्यांची नैसर्गिक घडण बदलते. टायलोसिनमुळे मायक्रोबायोमच्या परिपक्वतेवर अ‍ॅमॉक्झिलीनच्या तुलनेत जास्त परिणाम होतो, किती प्रमाणात व किती वेळा प्रतिजैवके दिली जातात त्यावर अनिष्ट परिणाम अवलंबून असतात, असे न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या लॉरा एम कॉक्स यांनी म्हटले आहे. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

* प्रतिजैविकांचे दुष्परिणाम
आतडय़ातील उपकारक जीवाणू नष्ट होतात
चयापचयाची क्रिया बिघडते
वजन वाढते, लठ्ठपणा येतो
हाडांची वाढ जास्त होते