त्रिपुरा आणि तामिळनाडूत पुतळ्याच्या तोडफोडीप्रकरणी भाजपा कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांवर आरोप होत असतानाच  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नेत्यांना तंबीच दिली. ‘भाजपाशी संबंधित नेते किंवा कार्यकर्त्यांचा पुतळ्याच्या तोडफोडीत सहभाग असल्याचे समोर आले तर त्यांच्यावर पक्षाकडून कठोर कारवाई केली जाईल’ असा इशाराच शहांनी दिला.

त्रिपुरा येथे भाजपा कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा पाडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. तर मंगळवारी तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. यातही भाजपाच्या स्थानिक नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याने भाजपावर टीका होत होती. अखेर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विटरवरुन या वादांवर प्रतिक्रिया दिली.

शहा यांनी ट्विट करत पुतळ्यांच्या तोडफोडीच्या घटनांचा विरोध केला. आम्ही अशा घटनांचे समर्थन करत नाही. या घटना दुर्दैवी आहे. मी त्रिपुरा आणि तामिळनाडूतील भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली आहे. पुतळ्याच्या तोडफोडीच्या घटनांमध्ये भाजपाच्या नेते व कार्यकर्त्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

लोकांच्या आयुष्यात बदल घडवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. भाजपा सर्वच विचारधारांचा आदर करणारा पक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.
पक्षश्रेष्ठींनी फटकारल्यानंतर तामिळनाडू भाजपाला जाग आली आहे. राज्याचे प्रदेशाध्यक्ष टी. सुंदरराजन यांनी आर. मुथूरमनची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्याचा आरोप मुथूरमनवर होता. पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी देखील पुतळ्याच्या तोडफोडीच्या घटनांचा निषेध केला. सर्वच पक्षांनी या घटनांचा विरोध केला असला तरी यावरुन राजकारण सुरुच आहे.