कथित राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याबद्दल देशद्रोहाचा आरोप असलेल्या जेएनयूच्या पाच विद्यार्थ्यांनी पोलिसांना तपासात सहकार्य करून आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करावे, असे आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी केले आहे.
पोलीस या विद्यार्थ्यांचा शोध घेत असतील, तर त्यांनी पोलिसांच्या तपासात सहभागी व्हावे आणि ते निर्दोष असतील, तर त्यांनी आपल्या निर्दोषत्वाचा पुरावा द्यावा, असे बस्सी म्हणाले.
विद्यार्थ्यांना अटक करण्याकरता पोलीस जेएनयूच्या परिसरात शिरतील काय, या प्रश्नावर बस्सी म्हणाले की, आमचे लोक अशाप्रकारची परिस्थती हाताळण्यास सक्षम आहेत. अशावेळी तपास अधिकारी सर्वात योग्य पर्याय निवडेल. जिथवर दिल्ली पोलिसांचा संबंध आहे, आमचा उद्देश नेहमीच शहरातील कायदा व सुव्यवस्था स्थिती राखणे हाच असतो.
देशद्रोहाच्या आरोपांच्या विरोधात उमर खालिद व इतरांनी रविवारी रात्री विद्यापीठाच्या परिसरात घोषणा दिल्या आणि ही ‘क्रांती’ असल्याचे सांगितले.