जगभरातील तंत्रप्रेमींमध्ये उत्सुकता असलेला आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर आयफोनच्या यापूर्वीच्या स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये कपात करण्यात आली आहे. आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसच्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी म्हणजे तब्बल २२ हजारांची घट झाली आहे. त्यामुळे आता आयफोनप्रेमींसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. नव्या दरांनुसार आयफोन ६ एस (१२८ जीबी) आता ६० हजारांना मिळणार आहे. यापूर्वी आयफोन ६ एसची किंमत ८२ हजार इतकी होती. तसेच आयफोन ६ प्लस ७० हजारांना मिळणार आहे. यापूर्वी आयफोन ६ प्लसची भारतीय बाजारपेठेतील किंमत ९२ हजार इतकी होती. याशिवाय, आयफोन एसईसाठी (६४ जीबी) आता ४९ हजारांऐवजी ४४ हजार रूपयेच मोजावे लागणार आहेत.
आयफोन ७ भारतीयांसाठी महागडाच, ७ ऑक्टोबरला भारतात येणार
अॅपलने काही दिवसांपूर्वी आयफोनची बहुप्रतिक्षित नवी श्रेणी लाँच केल्याने आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसच्या किंमतीत अशाप्रकारची घट होणे अपेक्षितच होते. मात्र, यावेळी आयफोन ७ लाँच झाल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच पूर्वीच्या स्मार्टफोनच्या किंमती पडल्या आहेत. आयफोन ७ हा भारतीय बाजारपेठेत ७ ऑक्टोबर रोजी दाखल होणार आहे. मात्र, त्याआधीच या फोन्सचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. भारतात दाखल होताना आयफोन ७ (३२ जीबी) मॉडेलची किंमत ६० हजारांपासून सुरू होणार आहे, तर आयफोन ७ प्लसची किंमत ७२ हजार इतकी असेल.
अ‍ॅपलने बाजारात दाखल केलेला आयफोन ७ हा कंपनीसाठी भविष्याची वाटचाल निश्चित करणारा आहे. या फोनचा मोठा भाऊ अर्थात आयफोन ७ प्लस यामध्येही कंपनीने काही महत्त्वपूर्ण बदल केले असून हे बदल आत्तापर्यंत आयफोन न वापरणाऱ्यांनाही मोहात पाडणारे आहेत.
आयफोनचे ‘सप्त’सूर!