अॅपलच्या आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस या दोन फोनची जगभरात चर्चा आहे. आयफोन ७ प्लसमधील ड्यूएल लेन्स कॅमे-याची सर्वांनाच भूरळ पडली आहे. पण या फोनमुळे आता कॅमेरा तयार करणा-या कंपन्यांची डोकेदुखी वाढली आहे. डीएसएलआर कॅमे-यात मिळणारे फिचर्स आता आयफोन ७ प्लस मध्येही मिळू लागल्याने हा फोन म्हणजे कॅमेरा उद्योगासाठी धोक्याची घंटाच ठरला आहे.
स्मार्टफोन्समुळे डीएसएलआर, एसएलआर कॅमेरा तयार करणा-या कंपन्यांना धोका निर्माण होईल अशी चिन्हे होती. पण स्मार्टफोनवर फोटो काढण्यात रमणा-यांना फोटोग्राफीची आवड लागेल आणि ते शेवटी डीएसएलआरकडे वळतील असे कॅमेरा कंपन्यांना वाटत होते. त्यामुळे स्मार्टफोन आले तरी आमचे क्षेत्र सुरक्षित असेल असे कॅमेरा उत्पादन क्षेत्रात काम करणा-या मंडळींचे म्हणणे होते. डीएसएलआर कॅमे-यासारखे फिचर्स स्मार्टफोनमध्ये नसतात. स्मार्टफोनमधील कॅमे-यात झूम करुन काढलेले फोटो चांगल्या दर्जाचे नसतात. ते पिक्सलेट होण्याचा धोका असतो. त्यासोबतच एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूच्या मागील भागाला म्हणजेच बॅकग्राऊन्डला डिफोकस करुन फोटो काढण्याचा पर्यायही स्मार्टफोनमध्ये मिळत नव्हता. पण आयफोन ७ प्लसने हा प्रचलित समज मोडून काढला आहे.
आयफोन ७ प्लसमध्ये १२ मेगापिक्सेलचा ड्यूऍल लेन्स कॅमेरा आहे. वाईड अँगल आणि टेलिफोटोसाठी अपार्चर एफ १.८ आहे. याशिवाय काही सॉफ्टवेअर्सची मदत घेत अॅपलने युजर्सना उत्तम दर्जाचे फोटो मिळतील याची दक्षता घेतली आहे. आयफोन ७ प्लसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात कॅमेरा वेगात झूम होऊ शकतो. तसेच झूम करुन काढलेले फोटो पिक्सलेट होत नाहीत असा दावाही केला जात आहे. आयफोन ७ प्लसमध्ये डिजिटल आणि ऑप्टिकल झूम करता येतो. 2x चे ऑपिक्टल आणि 10x चे डिजिटल झूमची सुविधा या फोनने उपलब्ध करुन दिली आहे.
ह्युंडाई पी ९ आणि एलजीचा व्ही २० हे दोन्ही फोन बाजारात दाखल झाले आहेत. पण या फोन्समधील ड्यूऍल लेन्स कॅमेरा हा अॅपलच्या तंत्रज्ञानासमोर काहीसा मागास दिसतो. अॅपलच्या आयफोन ७ प्लसमुळे युजर्सना फ्रेममधील कुठेही झूम करुन फोटो काढणे शक्य होईल.  आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस या दोन फोनमधील कॅमे-यांनी आधीच चांगल्या दर्जाचे फोटो देऊन ग्राहकांना प्रभावित केले होते. ‘आम्ही डीएसएलआर वापरु नको असे तुम्हाला सांगणार नाही. पण आयफोन ७ प्लसमध्ये सर्वोत्तम दर्जाचा कॅमेरा असेल ऐवढेच आम्ही सांगू शकतो’ असे अॅपलने लाँचिग सोहळ्यातच स्पष्ट केले होते. पण आयफोन ७ प्लसची किंमत आणि डीएसएलआरची किंमत यात देखील फरक असल्याचे जाणकार निदर्शनास आणून देतात. पण अॅपलने आयफोन ७ प्लसच्या माध्यमातून कॅमेरा तयार करणा-या कंपन्यांसमोर आव्हान निर्माण केले यात काही शंका नाही.