लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे दोन दिवसाच्या लडाख दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी पूर्व लडाखमधील फॉरवर्ड एरियाचा दौरा करत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी तेथील जवानांशी संवादही साधला. लष्करप्रमुखांना जवानांनी दाखवलेल्या उच्च मनोवृत्तीबद्दल कौतुक केलं तसंच यापुढेही अशाच पद्दतीने उत्साहाने काम करण्यास सांगितलं.

गलवानमध्ये चिनी लष्कराने केलेल्या हिंसक चकमकीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तेथील भारतीय कमांडर्सशी चर्चा करण्यासाठी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे हे मंगळवारी दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर रवाना झाले. लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे भारताच्या सीमेवरील लष्करी सज्जतेचाही आढावा घेत आहेत. सर्वात आधी त्यांनी जखमी जवानांवर उपचार सुरु असलेल्या लेह येथील लष्कर रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जखमी जवानांची विचारपूस करत त्यांचं कौतुकही केलं.

१५ जून रोजी सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत व चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी या वेळी खिळे लावलेल्या काठय़ा व इतर शस्त्रांनी हल्ला केला होता. गेल्या आठवडय़ात हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी लडाख व श्रीनगरला भेट देऊन भारतीय हवाई दलाच्या सज्जतेचा आढावा घेतला होता. चीनने कुठलीही आगळीक केल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्यास सज्ज असल्याचे त्यांनी अलीकडे म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेले सहा आठवडे दोन्ही देशांच्या लष्करात संघर्ष सुरू आहे. ६ जूनला लेफ्टनंट जनरल पातळीवरची पहिली चर्चा झाली होती, त्या वेळी दोन्ही देशांनी सैन्य हळूहळू माघारी घेण्याचे मान्य केले होते. पण नंतर गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांनी १५ जूनला हिंसाचार केला. भारत व चीन या दोन्ही देशातील सीमा ही ३५०० कि.मी लांबीची आहे. रविवारी सरकारने भारतीय सैन्यास चीनला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सडेतोड उत्तर देण्याचे स्वातंत्र्य दिले होते.