नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सीमेवर चीनसमवेत निर्माण झालेला तणाव संपुष्टात यावा अशी भारताची इच्छा आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी येथे सांगितले. त्याचवेळी भारतीय सैनिक कोणालाही देशाची एक इंचही भूमी हिसकावू देणार नाहीत, असेही संरक्षणमंत्र्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्य़ातील सुकनास्थित मुख्यालयात संरक्षणमंत्र्यांनी दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजा केली, त्यानंतर ते बोलत होते. सिक्कीममध्ये चीनच्या सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या शेराथांग येथे राजनाथसिंह पूजा करणार होते, मात्र खराब हवामानामुळे ते तेथे जाऊ शकले नाहीत.

चीनसमवेत सीमेवरील तणाव संपुष्टात यावा आणि शांतता प्रस्थापित व्हावी अशी भारताची इच्छा आहे, त्याचवेळी काही घटना घडत आहेत, मात्र आपले जवान कोणत्याही स्थितीत कोणाला एक इंचही भूमी हिसकावू देणार नाहीत याची आपल्याला खात्री आहे, असेही राजनाथसिंह म्हणाले.

लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर जे घडले त्यावेळी भारतीय जवानांनी जे शौर्य दाखविले ते इतिहासकार सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवतील याचा आपल्याला विश्वास आहे, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.