जम्मू- काश्मीरमधील बारामुल्ला येथे कर्तव्यावर असलेल्या सैन्यातील जवानाने एके ४७ बंदुकीसह पलायन केले आहे. हा जवान हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची शक्यता वर्तवली जात असून त्याच्यासाठी शोधमोहीमदेखील सुरु झाली आहे.

भारतीय लष्कराच्या १७३ व्या तुकडीत झहूर अहमद ठाकूर हा जवान शिपाई पदावर कार्यरत होता. झहूर ठाकूर हा मूळचा पुलवामा जिल्ह्यातीस निवासी असून त्याची नेमणूक बारामुल्ला येथे करण्यात आली होती. ठाकूर हा लष्कराच्या कॅम्पमधून पळाला असून त्याने सोबत लष्कराची एके ४७ बंदूक आणि तीन मॅगझिन नेल्याचे समोर आले आहे. ठाकूर हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला असावा अशी शक्यता आहे. झहूरने पलायन केल्याचे समोर येताच उत्तर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. झहूरसाठी सैन्याच्या पथकांनी शोधमोहीमदेखील सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दक्षिण काश्मीरमध्ये पोलीस आणि सैन्यातील जवानाने बंदुकीसह पळ काढल्याची घटना यापूर्वीही घडली होती. हे जवान दहशतवादी संघटनेत सामील झाले होते. हिज्बुल मुजाहिद्दीनने जम्मू काश्मीरमधील ४० तरुणांची संघटनेत भरती करण्यासाठी मोहीम राबवल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे ठाकूर दहशतवादी संघटनेत सामील झाल्याच्या चर्चेला जोर आला आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीन ‘बुरहान वानी दिवसा’चे आयोजन करण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या वर्षी ८ जुलैरोजीच बुरहान वानीचा मृत्यू झाला होता. या दिवशी जम्मू- काश्मीरमध्ये रॅलीचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.