अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला थंड प्रतिसाद

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेताना भारताने अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात दबाव वाढवण्याचे केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अमेरिका व संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानने भारताने घेतलेल्या निर्णयाविरोधात पाठिंबा मिळवण्याचे जे प्रयत्न केले त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

पाकिस्तानने काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींचा वापर करून सीमावर्ती भागात दहशतवादी कारवाया व घुसखोरी करू नये असा दम अमेरिकेने दिला आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला फार थोडा प्रतिसाद मिळाला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा एकात्मिक भाग असून तो देशांचा अंतर्गत प्रश्न आहे असे भारताने म्हटले होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगातील नेत्यांना भारताविरोधात कारवाई करण्याचे आवाहन करताना असे म्हटले होते की, जर अमेरिकेने मध्यस्थी केली नाही तर भारताबरोबरची परिस्थिती युद्धाच्या दिशेने जाईल. पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना देशोदेशीच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन भारताने घेतलेल्या निर्णयाची कल्पना दिली होती. पाकिस्तानला दहशतवादी कारवायांमुळे एफएटीएफ या आर्थिक कृती दलाकडून काळ्या यादीत टाकले जाण्याची शक्यता आहे. काहीही करा पण दहशतवादाचा वापर करू नका, असा कडक संदेश जागतिक  नेत्यांनी यावेळी पाकिस्तानला दिला आहे. अफगाणिस्तानच्या तालिबाननेही त्यांच्याशी सुरू असलेली  शांतता चर्चा काश्मीरच्या प्रश्नाशी जोडू नये असा इशारा दिला आहे.त्यामुळे पाकिस्तानला आणखी एक हादरा बसला आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानातील युद्ध थांबवण्याची घाई आहे. अफगाणिस्तानातील शांततेचा मार्ग काश्मीरमधून जातो हा पाकिस्तानचा युक्तिवाद कुणीच मान्य करायला तयार नाही. अमेरिकेने काश्मीरमधील मानवी हक्क स्थितीबाबत चिंता व्यक्त केली असली तरी जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

जोधपूर- कराची थर एक्स्प्रेसला पाकिस्तानचा हिरवा कंदील!

पाकिस्तानने गुरुवारी समझोता एक्स्प्रेस कुठलीही सूचना न देता अध्र्यावरच रोखल्यानंतर ती शुक्रवारी सकाळी भारतात परत आणण्यात आली. त्यानंतर जोधपूरहून कराचीला निघालेल्या थर एक्स्प्रेसला पाकिस्तानने हिरवा कंदील दिला आहे. या गाडीत १६५ प्रवासी असून शनिवारी पाकिस्तानने तिला पुढे जाण्यास परवानगी दिली.

ही गाडी पाकिस्तानलगतच्या सीमेवर गेल्यानंतर प्रवाशांचे हस्तांतर करण्यात आले.  पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी शुक्रवारी असे जाहीर केले की, जोधपूर- कराची दरम्यान या शेवटच्या गाडीला प्रवेश देण्यात येत आहे.

कराचीकडे जाणारी थर एक्स्प्रेस भारताच्या बाजूने आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या मुनाबाव स्टेशनवर पोहोचली. या गाडीत १६५ पैकी ८१ प्रवासी भारतीय असून ते त्यांच्या पाकिस्तानातील नातेवाईकांना भेटायला गेले आहेत. ८४ पाकिस्तानी प्रवासी यात असून ते व्हिसा मर्यादा संपल्यानंतर पाकिस्तानात परत जात आहेत. पाकिस्तानकडून एक गाडी शून्य बिंदूवर आली असून ती वेळेवर निघेल अशी अपेक्षा उत्तर-पश्चिम रेल्वेने व्यक्त केली आहे.

राजस्थानातील जोधपूर येथील भगत की कोठी स्टेशनवरून थर एक्स्प्रेस दर शुक्रवारी रात्री निघते. १८ फेब्रुवारी २००६ पासून ही सेवा चालू आहे. त्याआधी ४१ वर्षे  सेवा  बंद होती. पाकिस्तानातून रेल्वे कराचीपासून शून्य बिंदूवर येते व तेथे प्रवाशांची देवाणघेवाण होते. पाकिस्तानची गाडी सकाळी १० वाजता शून्यबिंदूवर आली आहे. गेल्या १३ वर्षांत  चार लाख प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

लाहोर-दिल्ली बससेवा बंद

पाकिस्तानने लाहोर-दिल्ली मैत्री बससेवा शनिवारपासून बंद केली आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या थर एक्स्प्रेस व समझौता एक्स्प्रेस या रेल्वेगाडय़ा बंद करण्याचा निर्णय आधीच जाहीर करण्यात आला होता. भारताने जम्मू-काश्मीरचा अनुच्छेद ३७० रद्द करून त्याचा विशेष दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानने दोन्ही देशातील रेल्वे सेवा बंद करण्याचे जाहीर केले होते. लाहोर-दिल्ली बससेवा ही फेब्रुवारी १९९९ मध्ये सुरू करण्यात आली होती पण २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर ती बंद करण्यात आली. नंतर जुलै २००३ मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. पाकिस्तानचे दूरसंचार व टपालसेवा मंत्री मुराद सईद यांनी सांगितले की, बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची जी बैठक झाली होती त्यातील निर्णयांच्या अनुषंगाने लाहोर-दिल्ली बससेवा बंद करण्यात आली आहे.  पाकिस्तान-भारत यांच्यातील बससेवा रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे. लाहोर दिल्ली बससेवेत दर सोमवार, बुधवार व शुक्रवारी दिल्ली पर्यटन महामंडळाच्या  बस दिल्ली गेट येथील आंबेडकर स्टेडियम येथून लाहोरला जातात.  पाकिस्तान पर्यटन महामंडळाच्या बस मंगळवार, गुरूवार, शनिवारी  दिल्लीहून लाहोरला जातात. परतीच्या प्रवासात दिल्ली पर्यटन महामंडळाच्या बस मंगळवार, गुरूवार, शनिवारी लाहोरहून सुटतात. पाकिस्तान पर्यटन महामंडळाच्या बस सोमवार, बुधवार व शुक्रवारी लाहोरहून सुटतात.