फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या सोपोरमध्ये सध्या शांतता आहे. काश्मीर खोऱ्यातील सोपोरमध्ये अजून कुठलेही मोठे आंदोलन झालेले नसले तरी ही वादळापूर्वीची शांतता ठरण्याची शक्यता आहे. इंडियन एक्सप्रेसने इथल्या युवकांची, नागरीकांची कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर मते जाणून घेतली. आम्ही शांत आहोत म्हणून आम्ही आत्मसमर्पण केले आहे असा गैरसमज करुन घेऊ नका असे अल्ताफ अहमद (३८) म्हणाला. शांत राहण्यामागे आमची रणनिती आहे. आम्ही काही तरी करावे अशी त्यांची इच्छा आहे. पण पुढे अजून खूप मोठी लढाई लढायची आहे असे सोपोर नूरबागमध्ये राहणाऱ्या अल्ताफ अहमदने सांगितले.

सरकारने सर्व व्यवस्था करुन ठेवली आहे. आम्ही प्रत्युत्तर द्यावे अशी त्यांची इच्छा आहे. पण आम्हाला योग्यवेळेची प्रतिक्षा करावी लागेल. आम्ही त्यांना आश्चर्याचा धक्का देऊ असे ७३ वर्षीय नाझीर अहमद म्हणाले. मागच्या काही वर्षात पर्यटक किंवा बिगर काश्मिरी व्यक्ती दहशतवाद्यांकडून मारले गेले त्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. पर्यटक किंवा बाहेरच्या कोणाचीही जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी झालेल्या हत्येबद्दल आम्ही माफी मागतो. आता प्रत्येक पर्यटक किंवा बिगर काश्मिरी मजूर इथे वास्तव्य करु शकतो असे मत राशिद नाबीने व्यक्त केले. तो कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

शनिवारी सरकारने काश्मीरमधल्या अनेक भागांमध्ये निर्बंध शिथील केले होते. हुरियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी सोपोरमध्ये राहतात. त्यांच्या घराजवळ कडेकोट पाहार असून लष्कराकडून फक्त काही ठराविक गाडया आतमध्ये सोडल्या जात आहेत. खोऱ्यात ही परिस्थिती दीर्घकाल राहण्याची शक्यता असून लोकही त्यासाठी स्वत:ला तयार करत आहेत. काही जण पाकिस्तान मदतीला येईल या आशेवर आहेत.

५० वर्षानंतर काश्मीरचा मुद्दा चर्चेत आला आहे. पाकिस्तान यामध्ये हस्तक्षेप करेल याची आम्हाला खात्री आहे. त्यांच्याकडे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांनी हस्तक्षेप करावा किंवा काश्मीर विसरुन जावे असे मत काश्मीर विद्यापीठातील एका युवकाने व्यक्त केले. सोपोरपासून २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बारामुल्लामध्ये शांतता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारामुल्लाच्या नागरीकांना या रोजच्या लढाईचा कंटाळा आला आहे. त्यांना कायमस्वरुपी तोडगा हवा आहे. संयुक्त राष्ट्रात काय होते ते आम्हाला पाहायचे आहे. काहीही घडले नाही तर पाकिस्तानने युद्ध पुकारावे आम्ही त्याचे स्वागत करु. रोज मरण्यापेक्षा एकदाच काय ते मेलेले बरे असे ५६ वर्षीय गुलाम हसन म्हणाले.