केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी राज्यसभेच्या पुढील कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या चेंबरमध्ये त्यांनी शपथ घेतली. ६५ वर्षांच्या जेटलींना उत्तर प्रदेशमधून राज्यसभेसाठी पाठवण्यात आलं आहे, पण प्रकृती खराब असल्याने त्यांना शपथ घेता आली नव्हती. किडनीवर उपचार सुरू असल्याने त्यांच्या शपथ ग्रहणासाठी आज विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी समाप्त झाला होता. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यसभेवर फेरनिवड झाल्यानंतर त्यांनी शपथही घेतली नव्हती. जेटली यांना रविवारी ११ वाजता राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांच्या चेंबरमध्ये शपथ देण्यात आली. यावेळी राज्यसभेतील विरोधीपक्ष नेता गुलाम नबी आझाद आणि भाजपाचे अनंत कुमार हे देखील उपस्थीत होते. गेल्या काही दिवसांपासून अरुण जेटलीं मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा पुढील महिन्यातील लंडनचा दौरा रद्द करण्यात आला आहे.