News Flash

शर्मा यांच्या मृत्यूचा व्यापम घोटाळ्याशी संबंध नाही!

जबलपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरूण शर्मा यांच्या दिल्लीतील हॉटेलमध्ये झालेल्या मृत्यूचा व्यापम घोटाळ्याशी काही संबंध नाही, असे मध्य प्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे.

| July 7, 2015 12:39 pm

जबलपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरूण शर्मा यांच्या दिल्लीतील हॉटेलमध्ये झालेल्या मृत्यूचा व्यापम घोटाळ्याशी काही संबंध नाही, असे  मध्य प्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान न्यायालयाने आदेश दिल्याशिवाय या घोटाळ्याची सीबीआय चौकशी केली जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारवर काँग्रेसने महाघोटाळा व मौत का सौदागर अशी टीका केली असताना आरोग्य मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, काँग्रेस या प्रकरणी राजकारण करीत आहे. मिश्रा यांनी सांगितले की, डॉ. शर्मा हे चांगले गृहस्थ होते व त्यांचा व्यापम घोटाळ्याशी काही संबंध नव्हता. काँग्रेस मृतदेहांवर राजकारण करून मृतांचा संबंध व्यापम घोटाळ्याशी जोडत आहे. काँग्रेस जे करीत आहे ते लोकशाहीच्या हिताचे नाही, काँग्रेसशिवाय कुणीही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केलेली नाही.
काळेबेरे नाही- बस्सी
दरम्यान, दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी सांगितले की, डॉ. शर्मा यांच्या मृत्यूमागे प्रथमदर्शनी काही काळेबेरे असल्याचे दिसत नाही. आमच्या पथकाने त्यांचा मृत्यू जेथे झाला तेथे भेट देऊन पाहणी केली. केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनीही भेट दिली, तेथे कुठलेही पुरावे सापडलेले नाहीत. पोलीस शर्मा यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली जात आहे. शर्मा हे व्यापम घोटाळ्यातील बोगस परीक्षार्थीची चौकशी करीत होते व त्यांचा दिल्लीतील द्वारका येथे एका हॉटेलात संशयास्पद मृत्यू झाला होता.

काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप
व्यापम घोटाळ्याशी संबंधित अनेक जणांचे गूढरीत्या मृत्यू झाले त्यावरून काँग्रेस राजकारण करीत असल्याचा आरोप मध्य प्रदेश सरकारने केला आहे.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे व्यापम घोटाळ्याचे सूत्रधार असून ते ‘मौत का सौदागर’ झाले असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
याला प्रत्युत्तर देताना सरकारचे प्रवक्ते आणि आरोग्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसवरच हल्ला चढविला आहे. मृतांच्या प्रश्नावरून विरोधी पक्ष राजकारण करीत असल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे.
ट्रक खरेदी घोटाळ्यात चौहान आणि त्यांच्या पत्नीवर आरोप होता, मात्र न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरविले ते चौहान यांचे प्राथमिक शिक्षण होते तर व्यापम घोटाळा करून आता मुख्यमंत्र्यांनी पीएच. डी. केली आहे, त्यामुळे डम्पर ते बम्पर असा चौहान यांचा प्रवास झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

अक्षय सिंह यांच्या व्हिसेराच्या तपासणीवर मत राखीव
व्यापम घोटाळ्यात संशयास्पद रीत्या मरण पावलेले दूरचित्रवाणी पत्रकार अक्षय सिंह यांच्या आतडय़ांच्या अवशेषांची म्हणजे आंत्रिक तपासणीवरील (व्हिसेरा) मत  गुजरातच्या दाहोद सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी राखून ठेवले आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान अक्षय सिंह यांच्या आतडय़ांच्या अवशेषांची तपासणी दिल्ली येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतही करण्यात येणार आहे. दरम्यान व्यापम घोटाळ्याशी राज्यपाल रामनरेश यादव यांचा कथित सहभाग असल्याने त्यांची पदावरून उचलबांगडी करावी यासाठी करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे.  या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अन्य याचिकांवर ९ जुलै रोजी सुनावणी घेण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 12:39 pm

Web Title: arun sharma death does not have relationship with vyapam scam
टॅग : Vyapam Scam
Next Stories
1 व्यापममुळे सरकारची अधिवेशनात कसोटी
2 अघोषित संपत्ती जाहीर करणाऱ्यांना ५ कायद्यांपासून संरक्षण
3 चीनच्या रस्त्यांवर भारतातील पर्यावरण समस्यांच्या विकृत जाहिराती
Just Now!
X