सत्ताधारी काँग्रेस व विरोधी पक्ष भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत घाम फोडणारे आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बरेलीत दंगेखोरांना चिथावणी देण्याच्या आरोपावरून तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या इत्तेहाद मिल्लत कौन्सिलचे (आयएमसी) प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांना दिल्लीत आम आदमी पक्षाचा प्रचार करण्याची विनंती केजरीवाल यांनी केली आहे. त्यावरून भाजप व काँग्रेसने केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
    मौलाना तौकीर सध्या उत्तर प्रदेश हातमाग महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. तौकीर यांच्याशी केजरीवाल यांनी बरेली येथे चर्चा केली होती. तौकीर यांनी केजरीवाल यांच्या पक्षाला समर्थन देत दिल्लीत सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष विजय गोयल यांनी केजरीवाल यांना लक्ष्य केले. केजरीवाल भाजपला धर्माध म्हणतात मग त्यांना तौकीर यांच्याशी युती कशी चालते, असा सवाल गोयल यांनी विचारला. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन व अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याविरोधात तौकीर यांनी फतवा जारी केला होता. त्याचीही आठवण गोयल यांनी केजरीवाल यांना करून दिली. तौकीर यांनी मात्र असा कोणताही फतवा जारी केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.