दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा करण्याच्या निर्णयावरून मोदी सरकारवर टीपेच्या स्वरात टीका करताना दिसत आहेत. नुकत्याच बीबीसीच्या हिंदी वृत्तवाहिनीवर झालेल्या मुलाखतीदरम्यान केजरीवाल यांचा अक्षरश: तोल गेला. निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर ५५ जणांचा मृत्यू झाला, त्याचा संबंध तुम्ही थेट सरकारशी कसा काय जोडता, असा प्रश्न यावेळी केजरीवाल यांना विचारण्यात आला. त्यावेळी केजरीवाल बीबीसी वृत्तवाहिनीच्या पत्रकारवर चांगलेच भडकले. यावेळी केजरीवाल यांनी म्हटले की, बँकेच्या रांगेत उभ्या राहणाऱ्या लोकांना काय त्रास होत आहे, हे विचारण्याची धमक आणि प्रामाणिकपणा तुमच्या क्षेत्रातील काही मंडळींमध्ये अजूनही आहे. त्यावर पत्रकाराने मीदेखील तेच काम करत आहे, असे सांगत केजरीवालांना थांबविले. खऱ्या आणि खोट्यात फरक करणे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ५५ लोकांच्या मृत्यूचा संबंध आपण थेट सरकारच्या निर्णयाशी जोडू शकत नाही, असे या पत्रकाराने म्हटले. त्यानंतर भडकलेल्या केजरीवाल यांनी बीबीसी किती प्रामाणिक आहे, हे जनता बघत आहे, असे म्हटले. ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर ५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीदेखील बीबीसी म्हणते याचा संबंध सरकारच्या निर्णयाशी जोडू नये. या सगळ्याला पारदर्शक पत्रकारिता म्हणायचे का, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. या सगळ्यानंतर पत्रकाराने बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अरविंद केजरीवालांचा आवाज टीपेला पोहचला. ५५ लोकांच्या मृत्यूचा सरकारच्या निर्णयाशी संबंध नाही, असे म्हणणाऱ्या तुमच्यासारख्या पत्रकारांची मला लाज वाटते. लोकांचा जीव जात असल्याचे वर्तमानपत्रात छापून येत असताना तुम्ही त्याची चौकशी झालेली नाही, असे म्हणता, असे सांगत केजरीवाल यांनी पत्रकारावर शाब्दिक हल्ला चढवला. मात्र, सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्यांकडे दुर्लक्ष कसे करून चालेल? हा फक्त ‘आप’चा दावा आहे, असा प्रतिसवाल या पत्रकाराने उपस्थित केला. त्यावर केजरीवाल यांनी या मुद्द्याला क्षुल्लक बनवू नका, असे म्हटले. तसेच तुम्हाला मुलाखत घ्यायची असेल तर नीटपणे घ्या, असेही पत्रकाराला सुनावले.