हरयाणातल्या राखिगडीइथल्या हडप्पा संस्कृतीच्या पुरातत्वखात्याच्या संशोधनात एक अत्यंत नवीन बाब पुढे आली आहे. आर्य हे भारतातले नसून ते बाहेरचे होते आणि त्यांनी भारतावर आक्रमण केले हा सिद्धांत चुकीचा ठरवणारे हे संशोधन आहे. या ठिकाणी आढळलेल्या मानवी अवशेषांच्या संशोधनातून आर्य हे मूळचे भारतातलेच होते व वैदिक क्रांतीही भारतातच झाली असे या संशोधनातून सिद्ध होत आहे.

पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाचे कुलगुरू वसंत शिंदे व लखनौच्या बिरबल साहनी संस्थेच्या डीएनए प्रयोगशाळेचे प्रमुख नीरज राय यांनी यासंदर्भात संशोधन केले असून ते लवकरच अहवाल प्रसिद्ध करणार असल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. “राखीगडी येथे सापडलेल्या मानवी अवशेषाच्या डीएनएवरून ते स्थानिक नागरिकांचेच असल्याचे खात्रीशीररीत्या सांगता येते. विदेशी नागरिकांचा काही प्रमाणात अंश आढळला असला तरी हे लोक मुख्यत: स्थानिकच असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे डीएनए ज्या काळातल्या लोकांचे आहेत त्यानंतरचा काळ वैदिक आहे, त्यामुळे वैदिक पर्व हे संपूर्णपणे भारतीय असून विदेशी सहभाग अत्यल्प आहे,” शिंदे म्हणाले.

वैदिक किंवा ऋग्वेदाचा काळ, अंत्यविधीच्या पद्धती, भांडी, बांधकामासाटी वापरलेल्या विटा, मानवी सांगाड्यावरून समजत असलेली चांगली आरोग्यशैली हे सगळं वैदिक काळ व त्याचे प्रणेते आर्य हे अस्सल भारतीय असल्याचंच सांगतात असं या संशोधनातून पुढे आलं आहे. अंत्यविधीच्या काही तत्कालिन पद्धती हजारो वर्षांनंतर आजही काही समुदायांमध्ये आढळून येत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

एका थिअरीप्रमाणे, जी मुख्यत: पाश्चात्यांनी रुजवली आहे, त्यानुसार आर्य हे मध्य आशियातून आले व त्यांनी भारतातल्या मागास समाजावर आक्रमण केले व त्यांच्यावर वैदिक संस्कृती लादली. परंतु, शिंदे यांनी सांगितले की, “असं काही आक्रमण झाल्याचं संशोधनात दिसत नाही. हडप्पा संस्कृतीच्या मानवी अवशेषांमध्ये मध्य आशियातील लोकांचा अंशा आढळत नाही, अत्यंत किरकोळ स्वरूपात इराणी अवशेष आढळतात, पण तेदेखील एकमेकांशी असलेला संपर्क दाखवतात, संघर्ष नाही.”

राखीगड हे हडप्पा संस्कृतीच्या संशोधनाची प्रचंड मोठी पुरातत्वखात्याची जागा असून ती हरयाणामधल्या हिसार येथे 300 एकरांमध्ये पसरलेली आहे. जवळपास 6000 वर्षांपूर्वीची ती अत्यंत प्रगल्भ संस्कृती होती असं हे संशोधन सांगतं. या संशोधनामुळे आर्य हे मध्य आशियातले किंवा बाहेरचे होते, त्यांनी भारतातल्या तत्कालिन कथित मागास समाजावर आक्रमण केलं व त्यांनी दक्षिणेकडे ढकललं, नागरीकरण म्हणजे काय याचे भारचाला धडे दिले वगैरे या आत्तापर्यंतच्या मान्यतेला खीळ बसण्याची शक्यता आहे. परिणामी वैदिक संस्कृती व तिचे प्रणेते आर्य हे मूळचे स्थानिक भारतीयच होते व ते अत्यंत प्रगत होते या विचारधारेस मान्यता मिळण्याची शक्यता आहे.