राजस्थानात सुरु असलेल्या राजकीय लढाईत नेमके किती आमदार कोणासोबत आहेत, काँग्रेसचं सरकार टिकणार कि, पडणार? मुख्यमंत्री अशोक गेहलोत सचिन पायलट यांच्या बंडानंतरही विधानसभेत बहुमत सिद्ध करु शकतील का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपण राजस्थान विधानसभा सदस्यांच्या आकड्यांवर एक नजर टाकून स्थिती समजून घेऊया.

– राजस्थान विधानसभेत एकूण २०० आमदार आहेत.

– विधानसभा अध्यक्षांसह काँग्रेसचे एकूण १०७ आमदार आहेत.

– विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १०१ आमदारांची आवश्यकता आहे. मंगळवारी जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला गेहलोत पकडून एकूण ८८ आमदार हजर होते. १० अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. त्याशिवाय भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा एक आमदार आहे.

– काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, काल राज्यपालांबरोबर झालेल्या बैठकीत गेहलोत यांनी १०४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला.

– फेअरमाँट हॉटेलमधील बैठकीला उपस्थित असलेले बीटीपीचे दोन आमदार आपल्या घरी निघून गेले. योग्यवेळी पाठिंबा जाहीर करु अशी भूमिका त्यांनी मांडली.

– रविवारी सचिन पायलट यांच्या गोटातून बाहेर पडलेल्या चार आमदारांनी गेहलोत यांना पाठिंबा देण्यात संकेत दिले आहेत.

– सचिन पायलट यांच्यासह एकूण १९ आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे.

– तीन अपक्ष आमदारांचाही पायलट यांना पाठिंबा आहे.

– सचिन पायलट यांना पाठिंबा देणाऱ्या १९ आमदारांना अशोक गेहलोत यांनी अपात्र ठरवले तर विधानसभेचे संख्याबळ कमी होऊन १८१ होईल.

– मग १८१ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी ९१ आमदारांचा पाठिंबा लागेल.

– भाजपाकडे सध्या ७५ आमदार आहेत. त्यांना राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीच्या तीन आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपाने सचिन पायलट यांच्यासोबत असलेले तीन अपक्ष आमदार, अन्य १० अपक्ष, सीपीआय (एम) चे दोन, बीटीपीचे दोन यांना पाठिंब्यासाठी राजी केले तर भाजपही सत्ता स्थापनेचा दावा करु शकते. कारण पायलट यांच्यासह १९ आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे बहुमताचा आकडा ९१ आहे. अशा स्थितीमध्ये भाजपा आणखी १७ आमदारांची मोट बांधून सत्ता स्थापनेचा दावा करु शकते.

एक्स फॅक्टर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला असलेले काही आमदार जरी फिरले तरी स्थिती बदलू शकते. अशोक गेहलोत त्यांच्याकडे बहुमत असल्याचा दावा करत असले तरी पुन्हा आमदारांची फोडाफोडी झाली तर चित्र पालटू शकते.