बुधवारी आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीतील निमाटी घाटाजवळ एका मोठ्या खाजगी बोटीने सरकारी बोटीला धडक दिल्यानंतर बुडाली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘मा कमला’ ही खासगी बोट निमाटी घाटातून माजुलीकडे जात असताना आणि सरकारी मालकीची बोट ‘त्रिपकाई’ माजुलीहून येत असताना ही टक्कर झाली. अंतर्देशीय जल वाहतूक (IWT) विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ‘मा कमला’ बोट बुडाली.

आयडब्ल्यूटीच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, बोटीवर १२० हून अधिक प्रवासी होते, परंतु त्यातील अनेकांना विभागाच्या मालकीच्या ‘ट्रिपकाई’ नौकेच्या मदतीने वाचवण्यात आले. जोरहाटचे उपायुक्त अशोक बर्मन यांनी सांगितले.

आतापर्यंत ४१ जणांना वाचवण्यात आले आहे. आतापर्यंत एकही मृतदेह सापडला नाही. जोरहाट जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की किती लोकांचा मृत्यू झाला, हे आम्ही अद्याप सांगू शकत नाही.


NDRF आणि SDRF जवानांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे. नदीत पडलेल्या बोटीमध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकीही होत्या.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी अपघाताबद्दल चिंता व्यक्त केली आणि माजुली आणि जोरहाटच्या जिल्हा प्रशासनांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने बचावकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले. त्यांनी मंत्री बिमल बोरा यांना अपघातस्थळी जाण्यास सांगितले. सरमा यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव समीर कुमार सिन्हा यांना चोवीस तास घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे आणि प्रवाशांच्या सुटकेसाठी सर्व शक्य प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.