आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन (NRC) तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पक्षांतर्गत नाराजीला सामोरं जावं लागत असून आसामचे प्रदेशाध्यक्ष द्विपेन पाठक यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणीला पक्षाकडून वारंवार होणारा विरोध आणि भुमिकेवर नाराज होत त्यांनी राजीनामा दिला आहे.

तृणमूल काँग्रेसने राष्ट्रीय नागरिक नोंदणी ही बंगाली आणि बिहारींना राज्याबाहेर काढून त्यांना निर्वासित करण्यात डाव आहे असा आरोप केला होता. द्विपेन पाठक यांनी हा आरोप फेटाळून लावत आपण याच्याशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. ‘टीएमसीने राष्ट्रीय नागरिक नोंदणी बंगालींना राज्याबाहेर काढण्यासाठी असल्याचं म्हटलं आहे, मात्र मला हे अजिबात पटत नाही. यादीत अनेक नावं नाहीयेत, मात्र नागरिक त्यासाठी पुन्हा अपील करु शकतात’, असं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्र आणि आसाम सरकारच्या भुमिकेवर टीएमसीने केलेल्या निषेधावरही द्विपेन पाठक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं त्यांचं म्हणणं आहे. ‘गोंधळ करुन काहीही मिळणारं नाही आहे. यामुळे आसाममधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल. तेथे आसाम आणि बंगालमधील नागरिकांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. जर काही अघटित झालं तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर खापर फोडण्यात येईल. त्यामुळेच मी राजीनामा देत आहे. मी नेहमीच आसामच्या बाजून बोलणार आहे’, असं त्यांनी म्हटलं आहे.

आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (NRC) अंतिम मसुदा जाहीर झाल्यानंतर येथील ४० लाख नागरिकांची नावे या यादीत नसल्याने ते बेकायदा ठरले आहेत. यावरुन संसदेत बराच खलही झाला असून विरोधकांनी ही मोहिम थांबवण्याचा आग्रह सरकारकडे धरला आहे. अवैधरित्या भारतात राहणाऱ्यांना देशाबाहेर घालवून देण्याचा सरकारचा मानस असला तरी या यादीतील तृटीही समोर आल्या आहेत. कारण, यामध्ये चक्क सरकारी सेवेत काम करणाऱ्या लष्करी अधिकारी, पोलीस, शिक्षक, गॅझेटेड अधिकारी यांसारख्याचाही या यादीत समावेश नसल्याने ते घुसखोर ठरले आहेत.