देशात झुंडींकडून मारहाण होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये गुरुवारी या घटनेची पुनरावृत्ती झाली असून एका मदरशात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना जबरदस्तीने जय श्रीराम म्हणायला सांगत मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. तर इतर ३ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

एफआरआरमधील आरोपांनुसार, उन्नावमधील दार-उल-उलूम फियाज-ए-आम नावाच्या मदरशात शिकणाऱे १२ ते १४ वर्षांचे काही विद्यार्थी येथील एका मैदानावर क्रिकेट खेळत होते. त्यावेळी मैदानात बजरंग दलाचे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना जय श्रीराम म्हणण्यास सांगितले मात्र, या विद्यार्थ्यांनी असे करण्यास नकार दिल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बॅट आणि स्टम्पने मारहाणीला सुरुवात केली. यामध्ये एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकाराची गंभीर दखल घेत मारहाण करणाऱ्या आरोपींवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असून याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या मदरशाच्या इमामने हा हल्ला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला असून तीन आरोपींची ओळखही पटली आहे.

दरम्यान, झारखंडमध्ये तबरेस अन्सारी मारहाण प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. संशयीत बाईकचोर असणाऱ्या तबरेसला खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली होती. तसेच मारहाण करणाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने जय श्रीराम म्हणण्यास सांगितले होते. डोक्यात मारहाण झाल्याने तबरेसचा ब्रेन हॅमरजने मृत्यू झाला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार डोक्यात जबर मारहाण झाल्याने त्याच्या कवटीला फ्रॅक्चर गेले होते त्यामुळे कोठडीतच त्याचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला होता.

तसेच उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडलेल्या एका घटनेत मोहम्मद आतिब नामक एका रिक्षा ड्रायव्हरला स्वच्छतागृहात कोंडून जबरदस्तीने जय श्रीराम म्हणायला लावत बेदम मारहाण करण्यात आली होती. तसेच झारखंडच्या रांचीमध्ये तीन मुस्लीम तरुणांना मारहाण करीत त्यांना जबरदस्तीने जय श्रीराम म्हणण्यास सांगण्यात आले होते.