आम आदमी पक्षातील अंतर्गत वादामुळे लवकरच दिल्लीत विधानसभा निवडणुका होतील, असे संकेत भाजपच्या आमदार ओ. पी. शर्मा यांनी दिले आहेत. ज्या प्रकारे सत्ताधारी आम आदमी पक्षातील वाद समोर येत आहेत, त्यावरून विधानसभेच्या निवडणुका यावर्षीच्या अखेरीपर्यंत अथवा पुढील वर्षी मार्चपर्यंत निवडणुका होतील, असे शर्मा यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात भाजपने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर महापालिका निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी मंगळवारी ‘विजय पर्व’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना ओ. पी. शर्मा यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. आम आदमी पक्षाच्या पापाचा घडा भरला आहे. भ्रष्टाचाऱ्यांचा गट केजरीवालांच्या नेतृत्त्वाखाली तांडव करत आहे. लवकरच ते थांबवण्यात येईल, असेही शर्मा म्हणाले. दिल्ली महापालिका निवडणूक आणि राजौरी गार्डन मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. दिल्लीच्या आणि जनतेच्या भल्यासाठी जे शक्य होईल ते करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. त्यावर अधिक भर देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचवेळी दिल्लीत मध्यावधी निवडणुका होतील, असे संकेत त्यांनी दिले. या वर्षीच्या अखेरपर्यंत अथवा पुढील वर्षी मार्चपर्यंत दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका पुन्हा घेण्यात येतील, असे संकेत त्यांनी यावेळी दिले.

आम आदमी पक्षाचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची सध्या चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी दिल्लीतील भाजपचे माजी अध्यक्ष सतीश उपाध्याय यांना विचारले. त्यावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र, सार्वजनिक जीवनात सर्वांशी संपर्क ठेवणे गरजेचे आहे. संपर्कात असेल तर त्यात लपवण्यासारखी कोणती गोष्ट नाही, असे ते म्हणाले. आम आदमी पक्षात राजीनामा सत्र सुरू झाले आहे. यापुढेही राजीनामा सत्र सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.