काशीविश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी येणाऱया विदेशी महिलांच्या पोशाखाबाबतीत एक जाचक नियम मंदिर समितीने लागू केला आहे. तोकडे कपडे परिधान केलेल्या महिलांनी मंदिरात दर्शनासाठी येताना साडी नेसणे मंदिराच्या व्यवस्थापनाने अनिवार्य केले आहे. एवढेच नाही तर व्यवस्थापनाने मंदिर परिसरात साडी व धोतर देणारा एक काऊंटर देखील सुरू केला आहे. तोकड्या कपड्यांत येणाऱया विदेशी महिलांना या काऊंटरवरून साडी घेणे अनिवार्य करण्यात आले असून साडी नेसूनच या महिला भक्तांना दर्शन घ्यावे लागणार आहे.

मंदिरात दर्शनासाठी येताना महिला भक्तांनी योग्य कपड्यात दर्शनासाठी यावे किंवा मंदिर प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली साडी नेसून दर्शन घ्यावे, असे फर्मान व्यवस्थापनाने काढले आहे. देवस्थानच्या परिसरात किमान साधेपणा राहावा हा या मागचा हेतू असून विदेशी महिला अत्यंत तोकड्या कपड्यांत दर्शनाला येत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच अंगप्रदर्शन करणारा पोशाख मंदीरात येताना असू नये हा यामागचा उद्देश असल्याचे सांगत मंदीर व्यवस्थापन देत असलेली साडी व धोतर नेसून दर्शनास जावे अशी अपेक्षा असून यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसल्याचेही मंदिराच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.