देशातील १०० पेक्षा जास्त पूल धोकादायक झाले आहेत, ते कोणत्याही क्षणी कोसळतील असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑगस्ट महिन्यात केले होते. या वक्तव्याला महिना उलटत नाही तोच ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्ये बोमीखलजवळ एका उड्डाणपूल कोसळून २ जण ठार तर १० लोक जखमी झाले आहेत.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी असलेल्या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकले असण्याचीही शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे या पुलाचे बांधकाम पूर्ण व्हायचे आहे. रविवारी दुपारच्या सुमारास या ठिकाणी १५ मजूर काम करत होते. त्याचवेळी या पुलाचा मोठा भाग कोसळला आहे आणि हे सगळे मजूर ढिगाऱ्याखाली अडकले आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपये मदत देण्याची घोषणा केली आहे. जखमी झालेल्या मजुरांवर मोफत उपचार करण्यात येतील असेही पटनायक यांनी म्हटले आहे. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही आश्वासन पटनायक यांनी दिले आहे.

या दुर्घटनेत सत्य पटनायक या ३९ वर्षीय उद्योजकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. सत्य पटनायक त्यांच्या मुलीसह पुलाखालून चालले होते तेव्हाच या पुलाचा मोठा भाग कोसळला ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली. सत्य पटनायक यांच्या मुलीवर भुवनेश्वरच्या एम्स रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.