जम्मू काश्मीर प्रश्नावर जगभराचे लक्ष वेधण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्याने नियंत्रण रेषा ओलांडून भारतात प्रवेश करण्याची धमकी दिली आहे. २४ नोव्हेंबरला हा मोर्चा काढण्यात येणार असून  पूंछ, मिरपूरसह तीन ठिकाणांवरुन मोर्चात सहभागी झालेले लोक भारतात प्रवेश करतील असे या नेत्याने जाहीर केले आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असून काश्मीर मुद्दा रेटण्यासाठी पाकिस्तानने नवा डाव खेळला आहे. पाकव्याप्त काश्मीर अर्थात आझाद जम्मू आणि काश्मीरचे माजी पंतप्रधान सरदार आतिक अहमद खान यांनी भारतावर मोर्चा काढण्याची तयारी सुरु केली आहे. अहमद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून २४ नोव्हेंबररोजी आम्ही नियंत्रण रेषा ओलांडून जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करणार आहोत असे ते म्हणालेत. भारताकडून जम्मू काश्मीरमध्ये होणा-या अत्याचारांची पोलखोल करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.  या मोर्चामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील अन्य पक्षांनीही सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. भारतीय सीमा रेषा ओलांडून हा मोर्चा जम्मू काश्मीरमध्ये नेणारच असा ठाम निर्धारच त्यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पाकिस्तानमधील बलुचिस्तानचा मुद्दा मांडला होता. यामुळे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासह विविध ठिकाणी काश्मीरमधील हिंसाचाराचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता. आता पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्यांना पुढे करुन भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता मोदी सरकार पाकिस्तानचा हा डाव कसा उधळून लावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.