जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांच्या निवासस्थानी आज(शनिवार) पार पडलेल्या बैठकीत ‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’ च्या सदस्यांनी मिळून गुपकार डिक्लेरेशन संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे सहभागी होते.

या बैठकीनंतर फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले की, ”ही काही देशविरोधी जमात नाही. आमचा केवळ हाच उद्देश आहे की, जम्मू-काश्मीर व लडाखच्या नागरिकांना त्यांचे अधिकार पुन्हा मिळावेत. धर्माच्या नावावर आमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतील. ही कोणतीही धार्मिक लढाई नाही.” तसेच, आम्ही भाजपाच्या विरोधात आहोत, देशाच्या नाही. असे देखील यावेळी फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले.

‘पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन’च्या बैठकीनंतर सज्जाद लोन यांनी माहिती दिली की, फारुख अब्दुल्ला या समितीचे अध्यक्ष तर मेहबूबा मुफ्ती उपाध्यक्ष असणार आहेत. या संबधी पुढील महिनाभरात कागदपत्रांची पुर्तता देखील केली जाणार आहे. या माध्यामातून आम्ही त्या गोष्टी बाहेर आणू ज्याबद्दल खोटा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.

या अगोदर १५ ऑक्टोबर रोजी देखील फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी राज्यातील अनेक पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीसह पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्सचे अधयक्ष सज्जाद लोन, पीपल्स मूव्हमेंटचे नेते जावैद मीर आणि माकपचे नेते मोहम्मद युसूफ तारिगामी उपस्थित होते.

अनुच्छेद ३७० ला पाठिंबा देण्यासाठी जो बहुपक्षीय निग्रह ४ ऑगस्ट रोजी दाखवण्यात आला, त्या निग्रहाला आणि त्या वेळी झालेल्या ठरावाला गुपकर ठराव असे संबोधले जाते. कारण, नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्षांच्या श्रीनगरमधील गुपकार येथील निवासस्थानी तो संमत झाला होता. यामध्ये सांगण्यात आले आहे की, सर्व पक्षांनी सर्वसंमतीने निर्णय घेतला आहे की , जम्मू-काश्मीरची ओळख, स्वायत्तता आणि त्याचा विशेष दर्जाचे रक्षण करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू.