करोनाचा वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात केली होती. त्यानंतर देशभरात लॉकडाउन करण्यात आलं होतं. त्यानंतर लॉकडाउनमुळे मरगळलेली अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी नियमांमध्ये बदल करत ही बंदी शिथिल करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनेकदा जनतेशी संवाद साधला होता. मात्र करोना काळातही पंतप्रधान मोदींच्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या उपस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता आलेली पहायला मिळालेली नाही. उलट या काळातील कार्यक्रमांच्या उपस्थितीमध्ये मागच्या वर्षीपेक्षा २५ टक्क्यांनी अधिक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात पंतप्रधान मोदींनी तंत्रज्ञानाचा वापर करुन १०१ सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. पंतप्रधान मोदी दिवसभरात एका पेक्षा जास्त कार्यक्रमांना उपस्थित होते. मागच्या वर्षी याच काळात मोदींनी देशांतर्गत झालेल्या ७८ कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्याच्यातुलनेत या वर्षी हे प्रमाण २५ टक्क्यांनी जास्त आहे.
सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये पंतप्रधान मोदींनी तंत्रज्ञानचा पुरेपूर वापर करत समाजातील सर्वच घटकांसोबत संवाद साधल्याचे पहायला मिळाले. त्यांनी ग्रामीण भागातील जनतेपासून, तरुणांपासून ते उच्च अधिकाऱ्यांपर्यंत संवाद साधला. या तीन महिन्यांच्या काळात मोदींनी २६ अशा सार्वजनिक प्रकल्पांचे तसेच त्यांच्या पायाभरणीचे उद्घाटन केले.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि इतर तंत्रज्ञानाद्वारे मोदींनी १० आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये देखील सहभाग घेतला आहे. ज्यामध्ये जी २० देशांची परिषद, आसियान राष्ट्रांची परिषद तसेच ब्रिक्स देशांच्या परिषदांचा समावेश आहे. या काळात मोदींनी उत्तर प्रदेशाती विविध योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. जवाहलाल नेहरू विद्यापीठातील स्वामी विविकेनंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करत तरुण विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. उत्तर प्रदेशात ‘हर घर जल योजना’ या उप्रकमाचे उद्घाटन केले. कोविड १९ संदर्भातील लसीच्या संदर्भात वैज्ञानिकांसोबतही चर्चा केली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या विविध विषयांसंदर्भातील अंतर्गत बैठकांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.