मागील काही आठवड्यांपासून चीनचे अनेक देशांबरोबर वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन खटके उडत आहेत. अनेक देशांबरोबर चीनचे परराष्ट्रसंबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाचाही या देशांच्या यादीमध्ये समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर आता हिंदी आणि पॅसिफिक महासागरामधील चीनचा वाढता धोका लक्षात घेता ऑस्ट्रेलियाने भारताबरोबर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. ऑस्ट्रेलियाचा संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड्स यांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचे वृत्त पीटीआयने दिलं आहे. अधिक सुरक्षित, सर्व समावेशक आणि हिंदी-पॅसिफिक महासागरातील प्रदेशासंदर्भात आमच्याशी समविचारी असणाऱ्या भारताबरोबर ऑस्ट्रेलिया भविष्यात आणखीन दृढ राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे असं रेनॉल्ड्स यांनी म्हटलं आहे. मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असणाऱ्या हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरातील बऱ्याच मोठ्या प्रदेशात चीनने दखल देण्यास सुरुवात केल्याचे मागील काही आठवड्यांपासून दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने चीनला हा अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे.

नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलियन नौदलाने हिंदी महासागरामध्ये संयुक्तरित्या केलेल्या युद्धाभ्यास हा दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होत असल्याचे दर्शवते, असंही रेनॉल्ड्स यांनी म्हटलं आहे. मागील आठवड्यामध्ये भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीने हिंदी महासागराच्या उत्तर-पूर्व भागामध्ये दो दिवसीय संयुक्त अभ्यास केला. हा एका व्यापक योजनेचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. एकमेकांना मदत करण्यासाठी तसेच गरज पडल्यास आवश्यक वस्तूंची मदत करण्यासाठी आणि ते सामान सैन्यतळांवर पोहचवण्यासंदर्भातील सहय्योग करारावर भारत आणि ऑस्ट्रेलियाने स्वाक्षऱ्या केल्यानंतर या युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आलं होतं.

ऑस्ट्रेलियासारखी विचारसरणी असणाऱ्या भारतासारख्या देशाबरोबरचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी आम्ही कायमच पाठिंबा देत राहणार आहोत असं रेनॉल्ड्स यांनी स्पष्ट केलं. याच वर्षाच्या सुरुवातील दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी डिजिटल शिखर संम्मेलनामध्ये सहभाग नोंदवल्यानंतर आमचे भारताबरोबरच सुरक्षेसंदर्भातील संबंध अधिक चांगले आणि सुदृढ झालेत. भविष्यात दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने संयुक्तरित्या आणखीन चांगलं काम या क्षेत्रात करतील अशी आपल्याला अपेक्षा आहे, असंही रेनॉल्ड्स म्हणाल्या.