मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात असाध्य आजार व वेदनांनी ग्रस्त पण बऱ्या होऊ न शकणाऱ्या रुग्णांना इच्छामरणाची परवानगी देणारा  कायदा करण्यात आला आहे. यात सदर रुग्ण मृत्यू येईल अशी घातक औषधे देण्यास त्यांच्या डॉक्टरांना सांगू शकतात.

राज्यातील हा ऐतिहासिक कायदा बुधवारपासूनच अमलात आला आहे. या कायद्यानुसार व्हिक्टोरियातील असाध्य आजाराने ग्रस्त  व वेदना होत असलेल्या रुग्णांना इच्छा मरण घेता येईल त्यासाठी त्यांना ६८ सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करावी लागेल.

राज्याचे मुख्यमंत्री डॅनियल अँड्रय़ूज यांनी सांगितले की, अशा प्रकरणात निर्णय घेण्यासाठी १२० डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले असून नवीन कायद्यात सहवेदनेचा व करूणेचा दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे.

व्हिक्टोरियाचे आरोग्य मंत्री जेनी मिकाकोस यांनी सांगितले की, आजचा दिवस वकील व बराच काळ वेदना सोसत जगणाऱ्या रुग्णांचा आहे, हे सर्व जण या बदलाची गेले अनेक वर्षे वाट पाहात होते.

हा कायदा मंजूर झाल्यानंतर इच्छामरणासाठी किमान १०० विनंत्या आल्या आहेत. परदेशातील अनुभव बघता पहिल्या बारा महिन्यात बारा किंवा त्याहून थोडय़ा अधिक लोकांना इच्छामरणाचा फायदा मिळेल. त्यानंतर वर्षांला १०० ते १५० या दरम्यान हा आकडा स्थिरावू शकतो. या कायद्यात ६८ तत्त्वांचा समावेश करण्यात आला असून त्यात सर्व पैलूंचा विचार केलेला आहे. इच्छामरणाचा लाभ घेण्यासाठी सदर व्यक्ती व्हिक्टोरियाची निवासी असावी व तिचे वय १८ च्या वर असावे. तिला असाध्य आजार व असह्य़ वेदना असणे आवश्यक आहे. सदर व्यक्तीचा सहा किंवा बारा महिन्यात नैसर्गिक मृत्यू होण्याची दाट शक्यता असली पाहिजे.इच्छामरणासाठी अर्ज केला असेल तरी त्या व्यक्तीला सर्व प्रक्रियेस दहा दिवस वाट पहावी लागणार आहे. हे विधेयक १८ महिन्यांनी मंजूर झाले आहे.