व्हॉट्सअ‍ॅपचे नवे गोपनीयता धोरण स्वीकारणे ही ऐच्छिक बाब आहे, एखाद्या व्यक्तीला त्यांच्या अटी आणि शर्ती मान्य नसतील तर ती व्यक्ती त्याचा वापर न करण्याचा अथवा त्या व्यासपीठामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊ शकते, असे दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.

व्हॉट्सअ‍ॅप हे खासगी अ‍ॅप आहे, ती ऐच्छिक बाब आहे, पटत नसल्यास ते स्वीकारू नका, दुसऱ्या पर्यायाचा वापर करा, असे न्या. संजीव सचदेव यांनी याचिकाकर्त्यां वकिलास सांगितले. या वकिलाने व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या धोरणाला आव्हान दिले होते. फेब्रुवारी महिन्यात या धोरणाची अंमलबजावणी  होणार होती, मात्र ती मे महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बहुसंख्य अ‍ॅपच्या अटी व शर्ती तुम्ही वाचल्या तर आपण कशा कशाला संमती देत आहोत हे कळल्यावर आश्चर्य वाटेल. गूगलचे नकाशे तुमची सर्व माहिती मिळवून ती साठवून ठेवते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

रोहतगी-सिब्बल संभाषणावरून न्यायालयात हास्याची लकेर

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या वादग्रस्त गोपनीयता धोरणावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एकाच अशिलाची बाजू मांडणाऱ्या मुकुल रोहतगी आणि कपिल सिब्बल या दोन ज्येष्ठ वकिलांमध्ये झालेल्या संभाषणावरून संभ्रम निर्माण झाला आणि न्यायालयात हास्याची लकेर उमटली. माहितीच्या देवाणघेवाणीवरून सुरू असलेल्या युक्तिवादादरम्यान निर्माण झालेले हलकेफुलके वातावरण न्यायाधीशही थांबवू शकले नाहीत.

व्हॉट्सअ‍ॅपच्या वतीने कोण युक्तिवाद करीत आहे आणि फेसबुकच्या वतीने कोण युक्तिवाद करीत आहे त्यावरून या दोन्ही ज्येष्ठ वकिलांमध्ये जे संभाषण झाले त्यामुळे न्यायालयात हलके फुलके वातावरण निर्माण झाले.

आपण व्हॉट्सअ‍ॅपच्या वतीने युक्तिवाद करीत असल्याचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले, तेव्हा आपण व्हॉट्सअ‍ॅपच्या वतीने युक्तिवाद करीत असून तुम्ही फेसबुकच्या वतीने युक्तिवाद करीत आहात, असे उत्तर सिब्बल यांनी दिले. त्यावर संभ्रमित झालेले रोहतगी म्हणाले, खरंच, आपल्याला वाटले की आपण व्हॉट्सअ‍ॅपच्या वतीने युक्तिवाद करीत आहोत. त्यावर न्या. सचदेव यांनी कळसच चढविला. ते हस्तक्षेप करीत म्हणाले की, कोण कोणासाठी युक्तिवाद करीत आहे त्याबाबतच्या माहितीची तुम्हा दोघांमध्ये देवाणघेवाण होणे गरजेचे आहे.